मुंबईतील प्रसिद्ध आर.के.स्टुडिओला शनिवारी आग लागली आणि अनेकांच्याच मनाला ही घटना चटका लावून गेली. या आगीत ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअॅलिटी शोचा स्टेज जळून खाक झाला. चित्रपटसृष्टीत अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या वास्तूत अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यामुळे ऋषी कपूर यांनी काही ट्विट करत दु:ख व्यक्त केलं. ट्विटरवर नुकताच त्यांनी आर.के. स्टुडिओचा एक जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला.

१९५० मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘आवारा’ चित्रपटातील ‘घर आया मेरा परदेसी’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी आर.के. स्टुडिओमध्ये सेट उभारण्यात येत होता. तेव्हाचा फोटो ऋषी कपूर यांनी शेअर केला. यासोबतच आगीनंतर त्या स्टेजची अवस्था दाखवणारा आणखी एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘१६ सप्टेंबर २०१७. भीषण आगीत झालेल्या नुकसानाने मी दु:खी आहे. या घटनेच्या जखमा राहतील पण त्याजागी नवा आर्ट स्टुडिओ उभारु.’

वाचा : ‘त्या’ वादानंतर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांचं स्पष्टीकरण

याआधी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना भावून होत ऋषी कपूर म्हणाले की,‘माझे भाऊ आणि मी मिळून पुन्हा इथे चार भिंती, एक छत असलेली वास्तू उभी करु. पण, त्या सर्व आठवणींचं काय? त्या कधीच परतणार नाहीत. असंख्य चित्रपट, त्यातही आमच्या बॅनरअंतर्गत साकारलेले चित्रपट, आर. के. मधील चित्रीकरणाच्या आठवणी कधीच परत येणार नाहीत. हे फक्त आमच्याच कुटुंबाचं नुकसान नसून, संपूर्ण चित्रपटसृष्टीचं नुकसान आहे.’

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिवंगत राज कपूर यांनी १९४८ साली चेंबूर येथे आर. के. स्टुडिओची स्थापना केली. ‘आग’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘बॉबी’, ‘मेरा नाम जोकर’, ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’, ‘प्रेमगंथ’, ‘आ अब लौट चले’ यांसह अनेक चित्रपटांची निर्मिती या स्टुडिओने केली होती.