ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिग्दर्शक अनुराग बासु आणि अनुराग कश्यप यांच्यावर आपला राग व्यक्त केला. नेहा धुपियाच्या नो फिल्टर विथ नेहा या शोमध्ये त्यांनी रणबीरच्या फ्लॉप सिनेमांना दिग्दर्शक जबाबदार असल्याचे म्हटले. जग्गा जासूस आणि बॉम्बे वेलवेट या दोन सिनेमांमुळे मुलाच्या करिअरमध्ये अपयशाचा डाग लागल्याचे त्यांना वाटते. या दोन्ही दिग्दर्शकांना त्यांनी रागाच्या भरात माकडदेखील म्हटले.

ऋषी यांनी म्हटले की, ‘एक अनुराग कश्यप आहे ज्याने ‘बॉम्बे वेलवेट’सारखा आणि ‘गँग ऑफ वसेपुर’सारखा सिनेमा केला. मला बॉम्बे वेलवेटची कथा समजलीच नाही. तर दुसरा आहे अनुराग बासु. ज्याने बर्फीसारखा एक अप्रतिम सिनेमा दिग्दर्शित केला. अनुरागने जेव्हा ‘बर्फी’ सिनेमासाठी माझ्या मुलाची निवड केली तेव्हा मला फार आनंद झाला. या सिनेमाने रणबीरच्या करिअरला नवी ओळख मिळवून दिली. यानंतर बासुने गज्जा जासूस की ‘जग्गा जासूस’सारखा सिनेमा केला. हा सिनेमा खूपच वाईट होता. माझ्यामते दोन्ही दिग्दर्शक आपल्या सिनेमांमध्ये जरा जास्तच गुंतले गेले. दोन्ही दिग्दर्शक या सिनेमांची निर्मिती ठरावीक बजेटमध्ये करु शकले असते. पण जेव्हा बिग बजेटवाला सिनेमा एखाद्याच्या हाती देतो तेव्हा माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं होतं. दोन्ही दिग्दर्शकांना एवढ्या बजेटचे काय करायचे हा प्रश्न पडला.’

ऋषी यांनी याआधीही ‘जग्गा जासूस’ सिनेमाच्या अपयशाबद्दल अनुराग बासुला सुनावले होते. अनुरागला जबाबदारी नसलेला दिग्दर्शक असे ते म्हणाले होते. ऋषी म्हणाले होते की, दिग्दर्शक सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी कोणाचा सल्ला घेत नाही, जणू काही ते सिनेमा नाही तर न्युक्लिअर बॉम्ब तयार करत आहेत.

‘जग्गा जासूस’ या सिनेमाचा रणबीर निर्माता होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. या सिनेमात रणबीर आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका होती. रणबीर आणि कतरिना यांच्यातील ब्रेकअपमुळे या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर गेले होते.