टेलिव्हीजन विश्वामध्ये सध्या विविध रिअॅलिटी शो सुरु आहेत. अशाच या रिअॅलिटी शो मधील एक कार्यक्रम म्हणजे राइझिंग स्टार. कलर्स वाहिनीवर या कार्यक्रमाला दिमाखात सुरुवात झाली असून सध्या हा शो त्याच्या अनोख्या धाटणीमुळे चर्चेत आला आहे. गायक शंकर महादेवन, पंजाबी गायक दिलजित दोसांज आणि गायिका मोनाली ठाकूर हे राइजिंग स्टारमध्ये मार्गदर्शकांच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. पण, सध्या हा कार्यक्रम चर्चेत आला आहे तो म्हणजे मोनाली ठाकूरवर झालेल्या एका टीकेमुळे.

सोशल मीडियावर कोणत्याही विषयाला उचलून धरुन त्याविषयीच्या चर्चांना उधाण येते ही बाब नाकारता येणार नाही. राइजिंग स्टारमध्येही काहीसे असेच घडल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका मोनाली ठाकूर हिने परिधान केलेल्या एका ड्रेसवर सोशल मीडियावर तिच्या एका फॉलोअरने आक्षेप घेऊन असे कपडे घालणे तिला शोभत नसल्याचे म्हटले. मोनालीच्या त्या फॉलोअरने लिहिले होते की, ‘तू राइझिंग स्टार या कार्यक्रमामध्ये फार चांगली भूमिका पार पाडत आहेस. पण, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या कार्यक्रमासाठी तू जे काही कपडे परिधान करतेस त्यावर माझा आक्षेप आहे. तू फक्त तोकडे कपडेच का घालतेस? या कार्यक्रमामध्ये स्पर्धकांना तुम्ही त्यांच्या पालकांप्रमाणे मार्गदर्शन करता आणि कोट्यवधी लोक तुम्हाला टेलिव्हिजनच्या माध्यातून पाहता. त्यामुळे ही गोष्ट फारच अस्वस्थ करणारी आहे’.

मोनालीने तिच्यावर झालेली ही टीका पाहता त्यावर ट्विट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीचे तिचे मत मांडले आहे. ‘तुझ्यासारख्या मुर्खाला कोणतेही प्रत्युत्तर देण्याआधी मी तुमची मानसिकता समजावून सांगू इच्छिते. मी तोकडे कपडे घातल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते याचा दोष मला किंवा इतर कोणत्याही मुलीला देण्यापेक्षा तुमच्या मानसिकतेला द्या’, असे म्हणत मोनालीने रोखठोक शब्दांत तिचा संताप व्यक्त केला आहे.

मोनालीवर झालेली टीका आणि याप्रकरणी तिने दिलेले स्पष्टीकरण पाहता सध्या सोशल मीडियावर याविषयीच्याच चर्चांना उधाण आले आहे. कोणा एका कलाकाराला तिच्या तोकड्या कपड्यांमुळे टीकेची झोड सहन करावी लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक, निया शर्मा यांच्यावर देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.