तमिळनाडूमध्ये जेव्हा-जेव्हा पोटनिवडणुकांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा अनेकांचेच लक्ष सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडे लागलेले असते. रजनीकांत यांच्या एकनिष्ठ चाहत्यांचा वाढता आकडा पाहता अनेकांनीच त्यांना मुख्यमंत्रिपदासाठीचे प्रबळ दावेदारही म्हटले आहे. पण, खुद्द रजनीकांत यांनी मात्र राजकारणात पाऊल ठेवण्यात कोणतेही स्वारस्य दाखवलेले नाही. त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची तयारी दाखवली नसली तरीही त्यांच्या एका विधानाने काय बदल होऊ शकतो, याचा प्रत्यय १९९६ मधील निवडणुकांमध्ये अनेकांनाच आला असेल. जर का जयललिता पुन्हा एकदा सत्तेवर आल्या, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही, असे विधान रजनीकांत यांनी केले होते. त्यांच्या याच विधानानंतर जयललितांचा बरगुर मतदारसंघातून पराभव झाला होता.

त्यामुळे निवडणुका म्हटलं की रजनीकांत यांच्या नावाच्या चर्चा रंगण्यास सुरुवात होणे अपेक्षितच आहे. सध्याचे एकंदर राजकीय वातावरण पाहता सुपरस्टार रजनीकांत यांनी एआयएडीएमकेच्या प्रमुख जयललिता यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आर के नगर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार गंगई आमरन यांनी मंगळवारी रजनीकांत यांची भेट घेतली. रजनीकांत यांनी गंगई आमरन यांना शुभेच्छा दिल्या असून या भेटीमुळे सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार असलेल्या गंगई आमरन आणि रजनीकांत यांच्यामधील मैत्रीचे नाते पाहता अनेकांनीच या भेटीबद्दल विविध तर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.

चर्चांचे उठलेले हे वादळ पाहता सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करु शकतात किंवा त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा गंगई आमरन यांचा सहभाग असलेल्या भाजप पक्षाला होऊ शकतो, असेही म्हटले जात होते. पण, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत या सुपरस्टारनेच स्वत: ट्विट करत अनेकांचे गैरसमज दूर केले आहेत. ‘माझा येत्या निवडणुकांमध्ये कोणालाच पाठिंबा नाही’ असे ट्विट करत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे.