बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याची बहिण अर्पिता खान हिच्या घरी चोरी झाल्याचे समजते. अर्पिताच्या घरातून तब्बल ३.२५ लाखाचे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. यासंबंधी तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिच्या घरी काम करणा-या मोलकरणीला ताब्यात घेतले आहे.
अर्पिता ही वांद्रे (पश्चिम) येथे शेर्ली राजन रोड येथील प्लश पॅसिफिक हाइट्स येथे राहते. तिच्या घरी काम करणआरी ३५ वर्षीय मोलकरीण अफसा खान ही रविवारपासून कामावर न आल्याने सदर घटनेविषयी कळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसा ही अर्पितासोबतच तिच्या घरी राहून काम करत असे. याचसोबत अर्पिताचे डिझायनर कपडेही चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हर आणि शेजारी काम करणा-या नोकरांची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी नालासोपारा येथील आरोपीच्या घरातून तिला अटक केली. गेल्या दीड वर्षापासून अफसा ही अर्पिताच्या घरी काम करत होती. पण पोलीस ठाण्यात तिचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नव्हते.
अर्पिता खान ही सलीम खान आणि हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे. सलीम खान यांना पहिली पत्नी सलमा खान यांच्यापासून अरबाज, सलमान, सोहेल आणि अलविरा ही चार अपत्ये आहेत. अर्पिता खानने २०१४ साली हिमाचल प्रदेशच्या आयुष शर्मा याच्याशी प्रेम विवाह केला होता. सलमानने अगदी थाटामात आपल्या बहिणीचे  लग्न लावले होते. अर्पिताला अहिल हा गोंडस मुलगा असून त्याचा जन्म मार्च महिन्यात जन्म दिला होता.