टेलिव्हिजनवर गाजलेली मालिका ‘सीआयडी’च्या निर्मात्याच्या घरी चोरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. निर्माता प्रदीप उप्पूर यांच्या घरी चोरी झाली असून, शुक्रवारी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.

प्रदीप यांच्या घरातून १२ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. कपाटातून पैसे आणि दागिने गायब झाल्याचे सर्वप्रथम प्रदीपच्या पत्नी वीणा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांकडे जाऊन चोरीची तक्रार दाखल केली. ही घटना ज्या बिल्डिंगमध्ये घडली तेथे महेश भट्ट यांच्यासारखे सेलिब्रिटीदेखील राहतात.

वाचा : सीआयडी मालिकेतील ‘एसीपी प्रद्युम्न’ यांचे निधन

सूत्रांच्या माहितीनुसार, घरातील कपाट उघडेच असल्याचे दिसल्यावर वीणा यांना संशय आला. त्यामुळे घरातील सर्व वस्तू जागेवर आहेत का ते त्यांनी बघितलं. तेव्हा काही पैसे आणि दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. नऊ लाखांची रोख रक्कम आणि तीन लाखांचे दागिने असा १२ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार शुक्रवारी रात्री पोलिसांकडे दाखल करण्यात आली.

वाचा : ‘सीआयडी’ इतके वर्ष चालेल असे वाटले नव्हते- शिवाजी साटम

बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यामधून काही सुगावा लागतो का ते आम्ही तपासून पाहत आहोत, असे जुहू पोलिसांनी सांगितले.