‘माय नेम इज बॉण्ड, जेम्स बॉण्ड!’ असं म्हणत पडद्यावरचा प्रत्येक क्षण जिंकणारे रॉजर मूर! बॉण्डचा हा जगप्रसिद्ध संवाद त्या त्या वेळी ती भूमिका रंगवणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याने म्हटला आहे. त्यांची प्रत्येकाची शैली वेगळी, प्रभाव वेगळा.. आणि इथेच रॉजर मूर यांनी रंगवलेल्या ‘बॉण्ड’चं महत्त्व जास्त आहे. ‘जेम्स बॉण्ड’ साकारणारे मूर तिसरे अभिनेते होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने बॉण्ड रंगवला त्याचा अनुभव प्रेक्षकांनी आधी कधीच घेतला नव्हता. रॉजर मूर यांच्याकडे ‘बॉण्ड’ हे पात्र सोपवताना निर्माता-दिग्दर्शकांनी त्याला आणखी शैलीदार केले होते. त्यात रॉजर मूर यांनी आपल्या अभिनय आणि संवादफेकीने स्वत:ची ओळख दिली. मूर यांच्या चटकदार डायलॉगची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असत. या संवादाच्या सोबतीला वाजणारी सिग्नेचर टय़ुन मूर यांच्या बॉण्डपटाचा संपूर्ण माहोल तयार करत असे. या रगेल आणि रंगेल नायकाची संभाषणकला हजरजबाबी होती. त्यांच्या नायिका ऊर्फ ‘बॉण्डगर्ल्स’सह शत्रूसोबत दोन हात करताना कायम उद्दामपणा आणि अरेरावीची भाषा करणारी मूर यांची ही संभाषणकला बॉण्डपणाची निशाणी मानली जात होती.

बॉलीवूड असो वा हॉलीवूड.. चित्रपटातील फ्रेम अन् फ्रेम दीर्घकाळ स्मरणात राहणं ही त्यातील संवाद आणि नायकाची संवादफेक यावर अवलंबून असते.  सिनेविश्वातील गाजलेल्या बॉण्डपटांपकी रॉजर मूर यांच्या चित्रपटांचं वैशिष्टय़ असं की, आपलं घुमेपण आणि तिरकस कल्पना पटवून देताना संवादात केवळ वरचढ राहणं बॉण्डला आवडायचं. चित्रपटातले संवाद कमी असले तरी ते चतुर आणि चाणाक्ष असावेत यासाठी संवादलेखकांनी कंबर कसली होती. संवादातील विनोदीभाव, वाक्यातील कोटी, खवचटपणा त्यांच्या अभिनयात आणखी मजा आणायचा. त्यांच्या ‘लिव्ह अँड लेट डाय’ या चित्रपटात बाँडगर्ल रोझी काव्‍‌र्हर हिच्यासोबतच्या बॉण्डच्या संवादातून बॉण्डचा खटय़ाळपणा आपल्याला सहज हसवतो..

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

रोझी: देअर इज अ स्नेक!

बॉण्ड: ओह येस, यु मस्ट नेव्हर गो इन देअर विदाऊट अ मुंगुस.

‘द मॅन विथ द गोल्डन गन’ या मूर यांच्या दुसऱ्याच बॉण्डपटात खलनायक स्कारमँगा याच्या गोल्डन गनसाठी सोन्याच्या बुलेट्स तयार करणारा सोनार लझार याला तोडीस तोड उत्तर देताना बॉण्डचा चाणाक्षपणा आणि नेहमी वरचढ राहण्याची वृत्ती दोन्ही प्रभावीपणे जाणवून देतो.

लझार: मिस्टर बॉण्ड, बुलेट्स डु नॉट किल. इट इज अ फिंगर दॅट पुल्स द ट्रिगर.

बॉण्ड: एक्झॅटली. आय अम नाऊ एिमग प्रिसाइजली अट युअर ग्रॉईन. सो स्पीक, ऑर फॉरएव्हर होल्ड युअर पीस.

बॉण्डगर्ल आणि जेम्स बॉण्डमधील संवादाच्या जुगलबंदीमध्ये बॉण्ड नेहमीच आपल्या चातुर्याने बॉण्ड गर्लला नि:शब्द करतो आणि प्रेक्षकांना पडद्यावरचा तो क्षण आनंद देऊन जातो. ‘द मॅन विथ अ गोल्डन गन’मधील बॉण्डगर्ल सईदा आणि बॉण्डमधील संवाद याचाच दाखला देतो.

बॉण्ड: डिड यु सी हु शॉट फेअरबँक्स?

सईदा: नो आय वॉज इन हिज आम्र्स. माय आईज वर क्लोज्ड.

बॉण्ड: वेल, अ‍ॅटलिस्ट ही डाईड हॅपी!

तसंच ‘फॉर युवर आईज ओन्ली’मधील बॉण्डगर्ल बीबी आणि बॉण्डमधील संवादही असाच द्वयर्थी आणि मजेशीर आहे.

बॉण्ड: डोन्ट ग्रो अप एनी मोअर.

बीबी: व्हाय?

बॉण्ड: द अपोझिट सेक्स वुड नेव्हर सर्वाइव्ह इट!

‘द स्पाय वुड लव्हड मी’ या दहाव्या बॉण्डपटातील बॉण्डगर्लसोबतचा रॉजर यांचा हा संवाद एपिकच म्हणावा लागेल!

गर्ल: बट जेम्स, आय नीड यू!

बॉण्ड: सो डज इंग्लंड!

बॉण्ड हा कधीच बोलघेवडा नव्हता, पण ज्या वेळी बोलण्याची गरज पडायची तेव्हा तो असा काही संवाद फेकायचा, की प्रेक्षक टाळ्या पिटतील. त्या संवादाला साजेशी रॉजर यांची देहबोली प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घ्यायची. ‘ऑक्टोपसी’ हा सहावा बॉण्डपट. सोव्हिएत सरकारच्या दागिन्यांच्या चोरीची केस हाताळताना बॉण्ड युरोपातील शस्त्रतस्करीचा शोध लावतो. यानिमित्ताने भारतातील उदयपूरमध्ये आलेल्या बॉण्डचा भारतातील सहकारी विजयसोबतचा संवाद गमतीशीर आहे.

विजय : हिअर द आर्यलड इज एक्स्क्लुझिव्हली फॉर वुमन, नो मेन अलाऊड.

बॉण्ड : सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन, आय विल डेफिनेटली हॅव टु पे इट अ व्हिझिट.

याच चित्रपटातील आणखी एक रॉजर मूर स्टाइलमध्ये बॉण्डचा प्रभावी संवाद..

कमाल खान : बॉण्ड हॅज एस्केप्ड.

ऑक्टोपसी : हाऊ केअरलेस ऑफ यु. ओह! बाय द वे कमाल, आय वुड लाइक यू टु मीट माय न्यू हाऊस गेस्ट.

बॉण्ड : अ‍ॅन ओल्ड फ्रेंड ऑफ द फॅमिली यूु माईट से.

कमाल खान : यू हॅव अ नॅस्टी हॅबिट ऑफ सव्‍‌र्हायिवग.

बॉण्ड : ओह, यू नो वॉट दे से अबाऊट द फिटेस्ट.

बॉण्डपटांची कथा, त्यातील बॉण्डचे चातुर्य, त्यातील बुद्धिमत्ता, युक्तिवाद, बॉण्डचं ‘द बॉण्ड’ असणं, त्याची देहबोली यामुळे बॉण्डपटांना संवादाची गरज कमीच भासली; परंतु जे काही संवाद होते ते उत्कृष्ट होण्यासाठी सखोल विचारपूर्वक काम करणारे संवादलेखक, पटकथाकारांची टीम मूर यांच्या चित्रपटांसाठी कार्यरत होती. मूर यांनी अभिनय, व्यक्तिमत्त्व, देहबोली, संवादफेक या सगळ्यांचा चपखल वापर करत ही डायलॉगबाजी अजरामर केली आहे.

रॉजर मूर यांच्या प्रसिद्ध बॉण्डगर्ल्स

बॉण्डपटातील नायिका ऊर्फ बॉण्डगर्ल्स म्हणजे ‘चेरी ऑन द टॉप’. चेरी म्हणाव्याच अशा या नायिका या चित्रपटांत अधिक मसाला आणायच्या. बार्बरा बॅच, लुईस चिल्स, माऊद अडाम्स, कॅरोल बँक्वेट, ग्रेस जॉन्स या अभिनेत्रींनी रंगवलेल्या बॉण्डगर्ल्स विशेष लक्षात राहतात. ‘द स्पाय व्हु लव्हड मी’मधील मेजर अन्या अमसोव्हा जी बार्बरा बॅच या अभिनेत्रीने पडद्यावर साकारली आहे. अत्यंत सुंदर आणि आकर्षक ललना म्हणून या बॉण्डगर्लला गौरवण्यात आले आहे. ‘डॉक्टर होली गुडहेड’ लुईस चिल्स हिने साकारली आहे. अंतराळवीर असलेली गुडहेड नंतर अंडरकव्हर सीआयए एजंट असल्याचं बॉण्डला समजतं. आईवडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सुडाने पेटलेली मेलिना हॅवलॉक ‘फॉर युवर आइज ओन्ली’मधील बॉण्डगर्ल लक्षात राहते, तर समोरच्याला थरारून टाकणारी थंड नजर आणि ‘आऊट ऑफ माय वे जेम्स’ असं म्हणत बॉण्डला नि:शब्द करणारी संवाद फेकण्याची कला कॅरोल बँक्वेटने उत्तम आत्मसात केली होती. ‘ऑक्टोपसी’मधील ऑक्टोपसी ही सर्वात उत्तम बॉण्डगर्ल म्हणता येईल. माऊद अडम्सनेही हे कणखर महिलेचे पात्र उत्तम साकारले आहे. ‘अ व्ह्य़ू टु किल’मधील ग्रेस जॉन्सने साकारलेली मे डे ही अत्यंत दुर्मीळ बॉण्डगर्ल म्हणून ओळखली जाते.

बॉलीवूडची ‘बॉण्ड’ प्रेरणा

बॉण्डपटांची जशीच्या तशी कॉपी बॉलीवूडमध्ये करण्यात आलेली नाही. मात्र त्याच्यातील काही युक्त्या उचलण्यात बॉलीवूडचे दिग्दर्शक माहीर होते. अमिताभ बच्चनची अनेक चित्रपटांमधील लकब, गॉगल घालण्याची शैली ही मूर यांनी साकारलेल्या बॉण्डपासून स्फुरलेली होती. ‘रिटर्न ऑफ ज्वेलथीफ’ या चित्रपटात धर्मेद्रचा लादीवरून त्याच रंगाचे कपडे घालून सरकत जाण्याचे एक दृश्य आहे. त्याची प्रेरणा बॉण्डपटावरूनच घेतली आहे. १९७३ ते १९८५ च्या दशकातील अनेक बॉलीवूड चित्रपटांवर बॉण्डपटांचा प्रभाव होता. हा काळ रॉजर मूर यांच्या बॉण्डपटांचा होता. बॉलीवूड चित्रपटांतील कॅसिनोमधील दृश्यांची प्रेरणा मूर यांच्या बॉण्डपटांवरच आधारित आहे.