पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या झाएन अलीने २०१२ मध्ये ‘सारेगमप’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’च्या बातमीनुसार शुक्रवारी झाएनचा शेखपुरामध्ये मित्राच्या घरी मृत्यू झाला. झाएन पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहात होता. २० जुलैला गुरुवारी रात्री मित्राला भेटण्यासाठी तो घरातून निघाला होता.

झाएनचा भाऊ सोनू अलीने सांगितले की, ‘मित्रांसोबत काही दिवसांसाठी फिरायला जाणार असल्याचे झाएनने आम्हाला सांगितले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला त्याच्या मृत्यूची बातमी कळाली. त्याचे कोणतेही प्रेमसंबंध नव्हते आणि आर्थिक गोष्टींचाही त्याच्यावर ताण नव्हता. एका चित्रपटात गाण्यासाठी तो तयारी करत होता आणि याबाबत तो खूप उत्सुकही होता.’

वाचा : ‘…तर मी शेतकरी झाले असते,’ कंगनाचं सैफला प्रत्युत्तर

वॉशरुममध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळल्याचे झाएनच्या मित्रांनी सोनू अलीला सांगितले. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांचा याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान झाएनचा भाऊ सोनूच्या माहितीनुसार त्याला ड्रग्स घेण्याची सवय होती. मर्यादित प्रमाणात तो ड्रग्स घ्यायचा असे सोनूने सांगितले. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसून त्याचे कुटुंबिय वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.