भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा एक खेळाडू म्हणून सर्वांनाच ज्ञात आहे. पण एक व्यक्ती म्हणून तो कसा आहे ते ‘सचिन :अ बिलियन ड्रिम्स’ या त्याच्या जीवनपटातून उलगडण्यात आले आहे. सचिनचा संपूर्ण जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला असून, उद्या हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. सचिनवरील आत्मचरित्र २०१४ मध्ये प्रकाशित झाले होते, त्यानंतर तीन वर्षांनी हा जीवनपट येतोय.

फोटो : ‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’चा भव्य प्रिमियर सोहळा

जेम्स एर्स्किन यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि रवी भागचंदका यांची निर्मिती असलेला ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’चा खास प्रिमियर काल मुंबईत पार पडला. प्रिमियरला सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन हेदेखील उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा सचिनचे सारावरील प्रेम दिसून आले. एक बाबा म्हणून सचिनची दुसरी बाजू या व्हिडिओत पाहायला मिळते. ज्या ठिकाणी हा प्रिमियर सुरु होता तेथे जोरदार हवा सुटल्याने साराच्या चेहऱ्यावर केस येत होते. फोटोसाठी पोज देत असताना सचिनच्या हे लक्षात आल्यावर त्याने लगेच तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला केले. त्यामुळे बाप-लेकीमधील अगदी काही सेकंदांचा हा क्षण लक्षवेधक ठरला.

वाचा : विराट-अनुष्कासोबत टीम इंडियाने पाहिला ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’

आपल्या वडिलांवरील जीवनपट पाहून आल्यानंतर साराने त्यावर प्रतिक्रियाही दिली. ती म्हणाली की, ‘सचिन तेंडुलकर या नावाभोवती असलेलं प्रसिद्धीच वलय मला कधी जाणवलं नाही. मी त्यांच्याकडे केवळ माझे बाबा म्हणून पाहायचे. लोकांना त्यांच्याबद्दल वाटणारा आदर आणि ते त्यांच्याविषयी काय विचार करतात हे मला चित्रपट पाहिल्यानंतर कळलं.’ चित्रपटातील दोन गोष्टी साराला खूप आवडल्या. यात सचिनने साराच्या शाळेत झालेल्या पालकसभांबद्दल सांगितले आहे. तसेच, सचिन-अंजलीच्या लग्नातील काही दृश्यदेखील यात आहेत. ही दृश्य साराला भावल्याचे तिने सांगितले.

सचिनची क्रिकेटची कारकीर्द सर्वानाच माहिती आहे. परंतु, आयुष्यातील महत्त्वाच्या चढउतारावेळी त्याच्या मनात काय चालले होते, हे कुणालाच ठाऊक नाही. चित्रपट बनवताना हा हेतू पक्का होता. त्यामुळे चाहत्यांनी पाहिलेल्या सचिनपेक्षा बरेच काही चित्रपटात पाहायला मिळेल, अशी सचिनला खात्री आहे.