मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. एखाद्या माहितीपटाच्या रुपात साकारण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये सचिन स्वत:सुद्धा त्याच्या कारकिर्दीबद्दल भाष्य करताना दिसणार आहे. २६ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतंच या चित्रपटाचं खास स्क्रिनिंगच पार पडलं. देशसेवेसाठी तत्पर असणाऱ्या सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.

‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी काहीजणांनी सचिनला भेटण्याचं स्वप्न साकार झाल्याचं म्हटलं. तर, काहीजणांनी ‘सचिनsss… सचिनssss..’ असा गजर करत मास्टर ब्लास्टरचं कौतुक केलं आहे. तसंच हा चित्रपट आवडला असल्याचं सांगत खास स्क्रिनिंगचा भाग होता आलं याबद्दलही सचिनचे आभार मानले आहेत.

‘हा चित्रपट पाहून आम्ही पुन्हा एकदा बालपणीच्या त्या आठवणींमध्ये रममाण झालो असं म्हणत सचिनने गाजवलेल्या काळाचे आम्ही साक्षीदार आहोत’, या शब्दांत एका अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली. ‘हा एक व्यावसायिक चित्रपट नसून माहितीपटाची चित्रपटरुपात केलेली मांडणी आहे. सचिनच्या बालपणापासून सुरु होणारा हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगाचा आढावा घेतोय. त्यामुळे हा एक चित्रपट नसून भावनिक प्रवास आहे’, असं म्हणत अरुण आर. एस. यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

army

army-2

army-3

army-4

army-5

army6

army-8

army-9

सर्वच अधिकारी सचिनचं कौतुक करत असताना त्यानेही या अनुभवाबद्दल त्याचं मत मांडलं. ‘हा चित्रपट बनविण्याचे ठरविल्यानंतरच याचा प्रिमियर भारतीय सैन्यातील अधिकाऱयांसाठी असेल असं मी ठरवलं होतं, त्यानुसार या शोचं आयोजन केलं गेलं. मी बॅट घेऊन मैदानात जात असताना एकटा असतो. पण, त्यामागे ड्रेसिंग रुम, घरी बसून माझ्यासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक जण आणि अब्जावधी लोक असतात. त्यामुळे माझ्या यशामध्ये तुम्हा सर्वांचा वाटा आहे. सैन्यदलातील अधिकारी हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत, देशासाठी करत असलेल्या सेवेबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.’ असं सचिन म्हणाला.