सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’ या आपल्या आगामी सिनेमाची माहिती दिली. ४४ वर्षीय सचिन हा स्वतः राज्यसभेचा खासदार आहे. सचिनने नुकतेच पंतप्रधानांसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करून याबद्दल माहिती दिली.

सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’ हा सिनेमा येत्या २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीवेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. ‘सचिन अ बिलिअन ड्रीम्स’ सिनेमाबद्दल पंतप्रधानांना सांगितले आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असं ट्वीट सचिनने केले.

‘जो खेले वही खिले,’ हा प्रेरणादायी संदेशही पंतप्रधानांनी या भेटीत दिल्याचं सचिनने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं. यासाठी त्याने मोदींचे आभारही मानले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकरसोबत चांगला वेळ घालवला असून, त्याचा जीवनप्रवास आणि कामगिरी १२५ कोटी भारतीयांसाठी अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
सचिनच्या या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स अर्स्किन यांनी केलं आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.