प्रसिद्ध दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. कसलेला अभिनेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सचिन खेडेकर आपल्याला या सिनेमात एका वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळणार आहेत. भास्कर पंडीत नावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सचिन खेडेकरांना डायरी लिहायची फार आवड असते. ते डायरीमध्ये त्यांच्या नित्यक्रम लिहीत असतात. टिझरमध्ये बापाचा नित्यक्रम नेमकी कसा असतो ते दाखवण्यात आलं आहे.

राष्ट्रगीताचं असं खास व्हर्जन तुम्ही आधी पाहिलं नसेल

या व्हिडिओमध्ये सचिन खेडेकर यांच्यासोबत ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘आशू’ म्हणजे पुष्कराज चिरपुटकर दिसतो. हा व्हिडिओ शेअर करताना बाबांच्या डायरीचं एक पान जिवंत झालंय! तुम्हीपण ते जगून पहा! हे सुरेख वाक्यही मन जिंकत. एकीकडे खेडेकर यांचा ‘कच्चा लिंबू’ सिनेमा लोकांची मनं जिंकत असताना दुसरीकडे त्यांच्या ‘बापमाणूस’ या आगामी सिनेमाचा टिझरही लोकांचं लक्षं वेधून घेत आहे.

संजय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या १५ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हापूस’, ‘आयडियाची कल्पना’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘टाईम प्लीज’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ अशा सिनेमांची प्रस्तुती केलेल्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ने ‘बापजन्म’ची प्रस्तुती केली आहे.

‘बापजन्म’चे संपूर्ण लेखन निपुण धर्माधिकारीने केले आहे. त्याने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या सिनेमात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘अमर फोटो स्टुडीओ’ हे त्याचे अलीकडील नाटक रंगभूमीवर उत्तमरीत्या सुरु आहे. त्याने भारतीय डीजीटल पार्टीसाठी सादर केलेल्या ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अॅण्ड निपुण’ या वेब शोच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला.

निपुण धर्माधिकारीने २००९ मध्ये ‘नाटक कंपनी’ या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शतकांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या संगीत नाटकांचे पुनर्रुजीवन केले. त्या माध्यमातून शेक्सपियरच्या परंपरेलाही त्याने नव्याने उजाळा दिला. या नाटकांची मराठी रंगभूमीवर तर वाहवा झालीच पण त्याचबरोबर अमेरिकेतील आणि अगदी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवातही त्यांना मानाचे स्थान मिळाले.