नेहमीच चाकोरी बाहेरचा विचार करणारा दिग्दर्शक अशी सचिन कुंडलकरची ओळख. याच ओळखीला साजेसा असा त्याचा ‘गुलाबजाम’ हा नवा सिनेमा लवकरच येतो आहे. ‘वजनदार’च्या यशानंतर कुंडलकर यांच्या या नव्या सिनेमाचे नाव ही उत्सुकता वाढवणारे आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाचा पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. कुंडलकर यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर प्रदर्शित करत सिनेमाची कथा नेमकी काय असणार हेही सांगितले. सिनेमाचे लंडनमधील चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहितीही कुंडलकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे.

https://www.instagram.com/p/BUaqwWjgIzE/

कथेतील नाविन्य हे कुंडलकर यांच्या सिनेमांचे वैशिष्ट्य असते. पण यावेळी सिनेमाचे पोस्टर बघूनही याची प्रचिती येते. हे पोस्टर बरेचसे बोल्ड आहे. यात सिद्धार्थ आणि सोनाली यांचे वेगवेगळे फोटो एकत्र केले आहेत. मराठीत अशा पद्धतीचे बोल्ड पोस्टर क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळेच सचिनच्या या ‘गुलाबजाम’चा पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली असेल, यात काही शंका नाही.
काय आहे कथा

‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. भारत भेटीत तो पुण्यात राहणाऱ्या राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती शिकवण्याचा निर्णय घेते. इथूनच त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. पण मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे हा चित्रपट आहे, असे कुंडलकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.