आतापर्यंत सईने अनेक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. प्रत्येक सिनेमातून ती काही ना काही शिकत गेली. सुरुवातीची सई आणि आताच्या सईमधला हा फरक प्रत्येकालाच जाणवेल.

आता तिचा वजनदार हा सिनेमाही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. वजनदार सिनेमात तिने फक्त अभिनयच केलेला नाही तर या सिनेमात तिने काही वेगळ्या गोष्टीही शिकल्या आहेत. या सिनेमात ती पडद्यासमोर जेवढी व्यग्र होती तेवढीच ती पडद्या मागेही व्यग्र होती. वजनदार सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये तिला तीन दिवसांचा ब्रेक मिळाला होता. पण या ब्रेकमध्येही तिने इतर कोणती खाजगी कामं न करता त्या दिवसांतही ती वजनदारच्या सेटवर यायची. आपली भूमिका आणि सिनेमाचे इतर काम कसे पार पडते याकडेही ती जातीने लक्ष देत होती. ती सहाय्यक दिग्दर्शकाच्याच भूमिकेत होती म्हणा ना..

चित्रिकरणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या व्यवस्थितच असल्या पाहिजे असा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा अट्टाहास असायचा, त्यामुळे या सिनेमाच्या आर्ट डिरेक्शन टीमला असिस्ट करण्याचे काम सईने केले होते. तसेच सिनेमाची फ्रेम सुंदर दिसण्यासाठी ज्या वस्तू आवश्यक असतात त्या वेळेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारीदेखील सईने उत्तमरित्या पार पाडली. त्याचसोबत रोजच्या दिवसाचे काम संपल्यावर सई सहाय्यक दिग्दर्शकासोबत बसून पुढील दिवसाचे शेड्युलदेखील ठरवित असे, तसेच राहिलेले सीन्स वेळेत कसे पूर्ण करता येतील यावर मार्ग काढत असे. इतकंच नव्हे तर जेव्हा सई सोडून बाकीच्या कलाकारांचे चित्रिकरण सुरु असायचे तेव्हा सई मात्र सहाय्यक दिग्दर्शकासोबत इतरांना सेटवर सूचना देताना दिसायची.

सईला पडद्यामागच्या भूमिकेत पाहून शूटिंग बघायला आलेल्या लोकांचा मात्र यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. कलाकारांच्या नखऱ्यांमुळे सेटवरील कामावर कसा आणि किती परिणाम होतो. त्याचवेळी पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची भावना काय असते या गोष्टींची ओळख सईला नक्कीच झाली असेल. त्यामुळे आता भविष्यात जर सई ताम्हणकर जर दिग्दर्शकाच्या रुपात दिसली तर आश्चर्य वाटून घेऊन नका.