भा.डी.प. म्हणजेच ‘भारतीय डीजीटल पार्टी’ या युट्युब चॅनेलची ‘कास्टिंग काउच विथ अमेय अॅण्ड निपुण’ ही वेब सिरीज सध्या बरीच गाजत आहेत. या वेब सिरीजचे सूत्रसंचालक अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांच्या डोक्यात आता टिक टिक वाजू लागलंय. नाही कळलं ना.. अहो, या कास्टिंग काउच विथ अमेय अॅण्ड निपुणच्या पुढच्या एपिसोडमध्ये मराठीतील दीवा सई ताम्हणकर हजेरी लावणार आहे.
आपल्या अभिनयाने आणि अदांनी सर्वाना घायाळ करणारी सई ताम्हणकर कास्टिंग काउचमध्ये दिसेल. अमेय आणि निपुणच्या अनौपचारिक संवादांना सई कशी उत्तरं देते ते पाहणे नक्कीच मजेशीर राहिल. ताई माई अक्का… सगळ्यांना बसेल आता सुखद धक्का! टिक टिक वाजणार डोक्यात धड धड वाढणार ठोक्यात लवकरच!, असे टीम सईने ट्विट केले आहे. आत्तापर्यंत या वेब सिरीजमध्ये राधिका आपटे, प्रिया बापट, सखी गोखले, श्रिया पिळगावकर, रिमा लागू, स्वानंदी टिकेकर, सैराट टीम यांनी उपस्थिती लावली आहे.
अभिनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक सारंग साठे, पॉला मॅग्लेन आणि अनुषा नंदकुमार यांनी एकत्र येऊन सुरू केलेली संस्था म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी.  त्याअंतर्गत सुरु झालेल्या ‘कास्टिंग काउच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण’ या मालिकेत हे दोन मित्र आपल्या एका नवीन चित्रपटासाठी अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट घेत आहेत.. त्यांना हे न सांगता, अशी याची मुख्य संकल्पना आहे. एकाच ‘काउच’वर बसून नटय़ांशी झालेला अनौपचारिक संवाद साधत हे दोघे धमाल उडवून देतात. एका चित्रपटासाठी अभिनेत्रीला कास्ट करण्याच्या धडपडीमुळे याला कस्टिंग काउच नाव देण्यात आले आहे, असे अमेय आणि निपुण यांचे म्हणणे आहे.