तुमच्याबाबतीत असे कधी झाले आहे का? की फार वर्षांपूर्वीचे फोटो किंवा व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटले की हे काय कपडे घातले आहेत?
किंवा जुने फोटो बघताना पूर्व प्रियकराचा फोटो किंवा व्हिडिओ बघताना तुम्ही नक्कीच हसत असाल ना? असे ही ते दिवस होते असा विचार नक्कीच मनात येत असेल. तुमच्या आमच्यासारखंच काहीसं बॉलिवूड कलाकारांचेही असते. जर करिना, सैफ आणि शाहिद यांनी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांनाही काहीसे असेच वाटेल.

या व्हिडिओमध्ये करिना एका पुरस्कार सोहळ्यामध्ये शाहिद कपूरसोबत बसली आहे. तिला ओमकारासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आश्चर्य म्हणजे हा पुरस्कार तिला सैफ अली खानने दिला होता. तिला हा पुरस्कार देताना सैफ तिच्याशी औपचारीक पद्धतीनेच बोलताना दिसला तर शाहीद तिच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसला. शाहिदने दिल्लीस्थित मिरा राजपुतशी विवाह केला. तर करिनानेही सैफशी लग्न करुन कधीही मागे फिरुन बघितले नाही.

जर तुम्ही हा व्हिडिओ नीट लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हाला बिपाशा आणि जॉन एकत्र बसलेले ही दिसतील. ते दोघेही करिनाला प्रोत्साहन देताना दिसत होते. खरंच तेव्हाचा हा व्हिडिओ त्यांनी पाहिला तर या कलाकारांनाही आता नक्की हसू येईल. हा व्हिडिओ म्हणजे नाती कशी बदलत जातात याचे उत्तम उदाहरण आहे.

असे असले तरी हे सर्व बॉलिवूड कलाकार आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी आहेत. प्रत्येकानेच आपल्या आवडत्या व्यक्तिशी लग्न केले आहे. त्यामुळे शेवट गोड तर सारेच गोड असे म्हणावे लागेल.