बॉलिवूड स्टार जोडी करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या बाळाच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. छोट्या नवाबाच्या नावासंदर्भात रंगलेल्या तर्कवितर्कावर आतापर्यंत अबोल असणाऱ्या सैफने तैमूरच्या नावाचा अर्थ समजावून सांगितला आहे.  २० डिसेंबर २०१६ ला करिनाने बाळाला जन्म दिला होता. करिनाच्या प्रसुतीनंतर सैफ आणि करिनाच्या चाहत्यांमध्ये बाळाच्या नावासंदर्भात अपेक्षेप्रमाणे कुतूहल निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. आजकालचे सेलिब्रिटी पालक आपल्या मुलांची हटके नाव ठेवण्याचा विचार करत असताना करिना आणि सैफने छोट्या नवाबाला जुनाट नाव देण्यास पसंती दिली होती.

तैमूर हे नाव ठेवल्यानंतर  छोट्या नवाबाच्या नावाचा अर्थ शोधण्याचे प्रयत्न झाले. सोशल मीडियावर तैमूर नावासंदर्भात चर्चा रंगल्या. चौदाव्या शतकातील एका शासकाच्या नावावरुन हे नाव सैफने का ठेवले? असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांना ऋषी कपूर यांनी खडे बोल सुनावले होते. मात्र सैफने यावर बोलणे टाळले होते. त्यानंतर जवळ जवळ तीन आठवड्यानंतर सैफ मुलाच्या नावासंदर्भात खुलेपणाने बोलला आहे. तैमूर नावाचा तुर्की शासक मला माहित आहे. पण मी माझ्या मुलाचे नाव त्याच्या नावावरुन ठेवलेले नाही, असे सैफने म्हटले आहे. तैमूर हा शब्द पारसी असून याचा अर्थ लोह (लोखंड) असा होतो, असे सांगत करिना आणि मला हा अर्थ आवडल्यामुळेच आम्ही आमच्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याचे सैफने सांगितले. करिनाला मी खूप नावे सुचवली होती, मात्र या नावाचा अर्थ पोलाद असल्यामुळे करिनाला हे नाव फारच आवडले असेही तो म्हणाला. तैमूर नाव माझ्या कुटुंबियाशी देखील निगडित आहे. माझ्या कुंटूंबियात हे नाव आहे. जसे माझ्या मुलीचे नाव मी माझ्या बहिनीच्या नावावरुन ठेवले आहे, अगदी तसेच तैमूर या नावाला सुद्धा माझ्या घरातील वारसा असल्याचे सैफने सांगितले.

सैफ अली खान आणि करिनाने आपल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवले असल्याची वार्ता पहिल्यांदा दिग्दर्शक करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली होती. आणि सगळीकडे आश्चर्याची लाट पसरली होती. त्यानंतर या आश्चर्याची जागा रागाने घेतली होती. ‘तैमूर’ हे नाव तुर्की शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ ‘लोह’ किंवा लोखंडासारखा मजबूत असाही होतो. मात्र त्याचा संबंध हा थेट चौदाव्या शतकातील तैमूरलंग या राजाशी जोडला गेला होता. चाहत्यांच्या टीकेचा हा महापूर सैफ-करीनापर्यंत पोहोचलाही असेल. मात्र त्यांनी यावर कोणतीही टीकाटिप्पणी  करणे टाळले होते.