बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौतने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केल्यानंतर हा मुद्दा सर्वत्र गाजतोय. यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यातही यावरुन करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवनने कंगनाला कोपरखळी मारली. त्यानंतर तिघांनीही कंगनाची माफीदेखील मागितली. मात्र आता सैफ अली खानने यासंदर्भात एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे सैफने स्पष्टीकरण दिले असून घराणेशाहीला प्रोत्साहन देण्यात प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियाच अग्रेसर आहेत असा आरोपही त्याने केलाय.

‘डीएनए’ वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या या पत्रात त्याने म्हटले की, ‘मागील काही दिवसांपासून आयफाच्या मंचावर करण जोहर, वरुण धवन आणि मी सादर केलेल्या परफॉर्मन्सबद्दल खूप काही बोललं जातंय. ती फक्त एक मस्करी होती. ते सर्व मी लिहिलं नव्हतं आणि त्यावर माझा विश्वासही नाही. आमच्यावरच केलेली ती एक थट्टा होती. या गोष्टीला जास्त महत्त्व नाही द्यायला पाहिजे होतं. कंगनाला त्या गोष्टीचे वाईट वाटले असावे म्हणून मी तिची माफी मागितली. तिला फोन करून वैयक्तिकरित्या मी तिची माफी मागितली. त्यामुळे हा विषय इथेच संपायला हवा होता.’

वाचा : कंगनाच्या मदतीला धावून आली तिची बहिण रंगोली

‘आजकाल लोकांना दाखवण्यासाठी माफी मागितली जाते असं मला वाटतं. कारण लोकांचा विश्वास त्यांना गमवायचा नसतो. आजकाल सोशल मीडियावरच एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात, श्रद्धांजली वाहतात आणि याच कारणामुळे मी सोशल मीडियावर नाही. आपल्या भावना खोट्या असल्याचा आभास यातून होतो. विनोद करण्यासाठी अशा प्रकारे मूर्खपणा केल्याची ही माझी पहिली किंवा शेवटची वेळ नाही आणि याबद्दल मी कंगनाची माफी मागितल्यानंतर मला आता कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही,’ असे सैफने या पत्रात म्हटले.

वाचा : आत्महत्येच्या बातमीवर फोटो लावणाऱ्या वेब पोर्टलला मोनाली ठाकूरने खडसावले

यापुढे प्रसारमाध्यमांवर निशाणा साधत त्याने पत्रात पुढे म्हटले की, ‘घराणेशाहीचा झेंडा मिरवाणाऱ्यांमध्ये प्रसारमाध्यमंच अग्रेसर आहेत. तैमुर, शाहिदची मुलगी मिशा आणि शाहरूखचा मुलगा अब्राम यांचा कशाप्रकारे ते उल्लेख करतात ते पाहा. त्यांचे फोटो काढतात, त्यांना अधिकाधिक महत्त्व देतात आणि बिचाऱ्या त्या मुलांकडे दुसरा कोणता पर्याय राहत नाही. लहान वयातच त्यांना सेलिब्रिटी होण्याइतक्या समस्यांना सामोरं जावं लागतं. स्टार किड्सना अवाजवी महत्त्व दिलं जातं असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते खरंच आहे आणि हे महत्त्व प्रसारमाध्यमांनीच दिलंय. तैमुर, सारा, इब्राहिमला पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये असते. लोकांना हे हवंय आणि प्रसारमाध्यमं ही इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे या दुष्टचक्रामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत.’