‘सैराट’ चित्रपटापूर्वी जग सुंदर होत का? असा सवाल उपस्थित करत सैराटमुळे बलात्काराच्या घटना होत असतील, तर ‘या  चित्रपटासह मला फाशीवर चढवा, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एका कार्यक्रमात दिली. यावेळी त्यांनी ‘सैराट’ चित्रपट हा महिला प्रधान असल्याचे देखील सांगितले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ मराठी चित्रपटाने राज्यासह देशभरामधील लोकांना अक्षरश: वेड लावले होते. एकीकडे हा मराठी चित्रपट लोकप्रियतेचे शिखर गाठत असताना, या चित्रपटाच्या मांडणीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हा चित्रपट संस्कृतीला घातक असल्याचे देखील चर्चा रंगल्या होत्या. कोपर्डी प्रकरणानंतर पुन्हा या चित्रपटावर टीका होऊ लागल्या. चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर नागराज मंजुळे आजही राज्यभरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. ‘लोक जगण्यापेक्षा चित्रपटाला गांभिर्याने घेतात.’ असे ते प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतात. नागराज मंजुळे नावाच्या मराठमोळ्या माणसाचे दिग्दर्शन असलेली तिसरी कलाकृती, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एरव्ही चित्रपटातील नायक-नायिकांच्या फुटपट्टीत कुठेही बसले नसते असे दोन नवोदित कलाकार, अजय-अतुलचे संगीत आणि प्रेमकथा एवढाच जामानिमा घेऊन आलेला ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे विचारांचं एकच सैराट वादळ सुरू झालं. या चित्रपटाने समाजातील सगळ्याच स्तरांतून एक संवाद सुरू केला.