नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटाने अकलूजच्या रिंकु राजगुरु या शाळकरी मुलीला प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवलं. पण असे असले तरी रिंकू तिचे चित्रपटसृष्टीतील करियर सांभाळत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेल असे तिच्या कुटुंबाने म्हटले होते. त्यानुसार सोलापूरातील अकलुजच्या जिजामाता कन्या प्रशाला केंद्रावर सैराट सिनेमाची नायिका आर्ची अर्थात रिंकु राजगुरु १० वीच्या परीक्षेसाठी उपस्थित झाली होती.

अजूनही आर्चीची अर्थात रिंकू राजगुरुची प्रसिद्धी लोकांमध्ये कमी झालेली नाही असेच दिसते. रिंकू १० वीचा पेपर द्यायला गेली असतानाही तिचे गुलाबांची फुलं देऊन स्वागत करण्यात आले होते. रिंकूचे स्वागत केंद्र प्रमुख मंजुषा जैन यांनी केले. सध्या हा फोटो व्हायरलही होत आहे. काही दिवसांपूर्वी रिंकूने शिक्षणाला रामराम ठोकला अशा बातम्या येत होत्या. पण त्यात तथ्य नसल्याचे रिंकूच्या बाबांनी स्पष्ट केले.

रिंकूचे वडिल महादेव म्हणाले होते की, तिची आई आणि मी आम्ही दोघंही शिक्षक आहोत. अकलूज येथील स्थानिक शाळेत आम्ही मुलांना शिकवतो. असे असताना शिक्षकांची मुलगीच शिकणार नाही असे कसे होईल? असा सवालही त्यांनी केला होता. पण रिंकूला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ती शाळेत जाऊ शकत नव्हती. त्यामुळेच तिने १७ नंबंरचा फॉर्म भरला होता. म्हणजे ती दहावीची परीक्षा बाहेरुन देणार होती. रिंकूला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. पण तिच्या करिअरबद्दल आत्ताच काही बोलणे योग्य नसल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.

दरम्यान, ‘सैराट’ सिनेमाचा रिमेक कन्नड भाषेतही येणार असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वीच आली होती. या सिनेमाचे चित्रीकरण आता पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रिंकू राजगुरु दिसणार आहे. ‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेला ‘मनसु मल्लिगे’ हा सिनेमा दिग्दर्शक एस. नारायण यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश करणार आहे. ‘सैराट’च्या दाक्षिणात्य भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत.

एस नारायण म्हणाले की, रिंकूने सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले असून ती सध्या दुसरे कोणतेच काम हाती घेत नाहीये. ती सध्या तिच्या दहावीच्या अभ्यासात व्यग्र आहे. परिक्षेनंतर ती ‘सैराट’ दिग्दर्शकाबरोबर काम करणार आहे. मनसु मल्लिगे या चित्रपटात आकाशने ठोसरने साकारलेली परश्याची भूमिका अभिनेता निशांत साकारत आहे. निशांत हा खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते साथ्या प्रकाश यांचा मुलगा आहे.