नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास रचला. या चित्रपटाने महाराष्ट्रातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही याडं लावलं. ‘सैराट’मुळे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीला मिळाले. रिंकूला तर चित्रपटातील तिच्या अभिनयाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, सैराट या चित्रपटाच्या यशानंतर रिंकू राजगुरूचे असंख्य चाहते बनले आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री कुठेच दिसलेली नाही. ती सध्या काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. तर त्याचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

‘सैराट’ चित्रपटाचा रिमेक कन्नड भाषेतही येणार असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वीच आली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण आता पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रिंकू राजगुरु दिसणार आहे. ‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेला ‘मनसु मल्लिगे’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. रिंकू यावर्षी १० वीत असल्यामुळे तिला अभ्यासासाठी पुरेसा वेळ हवा होता. त्यामुळेच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. मात्र अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सध्या कन्नड भाषेतील या चित्रपटाची फार क्रेझ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटांतील गाण्यांचे ऑडिओ लॉन्च करण्यात आले आहेत. अगदी कमी वेळात या गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

‘मनसु मल्लिगे’ या चित्रपटाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश करणार आहे. यासंबंधीचे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेस या संकेतस्थळाने दिले आहे. दरम्यान, ‘सैराट’च्या दाक्षिणात्य भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत.

manasu-mallige-photos-images-54222

sairat