चित्रपट हे समाजाचा आरसा असतात, असं म्हटलं जातं. काही चाहते तर चित्रपटातील कलाकारांना त्यांचे आयडॉलही मानायला कमी करत नाहीत. एखादा चित्रपट बघून आल्यावर काहीजण स्वतःला एखाद्या पात्रामध्ये पाहतात किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्तीतरी अगदी तशीच असल्याचे त्यांना वाटते. अनेकदा लेक असावी तर अशी किंवा सासू असावी तर अशी…. अशा प्रकारची उदाहरणं देण्यासाठीदेखील चित्रपट किंवा टेलिव्हिजनवरील पात्रांचे दाखले दिले जातात. पण, गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’मधील आर्चीच्या वडिलांना पाहिल्यावर ‘असे, वडील नको रे बाबा….’ अशीच काहीशी भावना अनेकांच्या मनात डोकावल्या असतील. मात्र, हे केवळ एक पात्र होते. ‘सैराट’मध्ये आर्चीच्या वडिलांची अगदी छोटीशी पण तितकीच दमदार भूमिका साकारली होती अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांनी.

‘सैराट’ने अक्षरक्षः लोकांना याडं लावलं. संपूर्ण महाराष्ट्र या चित्रपटामुळे झिंगाट झाला होता. ‘सैराट’मुळे विश्वकर्मा यांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं पण त्याचसोबत खलनायकाची भूमिका साकारल्यामुळे त्यांना थोडासा त्रासही सहन करावा लागला. कटप्पानं बाहुबलीला का मारलं? हा जसा एक राष्ट्रीय प्रश्न बनला त्याचप्रमाणे आर्ची-परश्याला का मारलं? हा प्रश्नदेखील लोकांना सतावू लागला होता. त्यामुळे काही लोकांनी तर विश्वकर्मा यांना हा प्रश्न विचारून भांबावून सोडलं. तो चित्रपटाच्या कथेचा एक भाग होता. मला जे काम दिलं ते मी केलं, असं उत्तर देऊन विश्वकर्मा कंटाळले. अखेर, आर्ची-परश्याला का मारलं, ते नागराजला जाऊन विचारा.. असंच उत्तर ते प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला देऊ लागले. पण, यातही चित्रपटाचं यश असून, ऑनर किलिंगचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचल्याचं मत विश्वकर्मा यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना व्यक्त केलं.

rajesh tope devndra fadnavis
“एक टक्काही दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन”, राजेश टोपेंचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान; जरांगे पाटलांबाबत स्पष्ट केली भूमिका!
nafe singh rathee
हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?
satya pal malik
मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!
Alexei Navalny Death
अलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत

vishwakarma-family

विश्वकर्मा यांचे वडील कडा कारखान्यात वॉचमन या पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच संपूर्ण बालपण कडा कारखान्याजवळ व्यतित झालं. कडा कारखान्याविषयी मनात विशेष जिव्हाळा असलेल्या विश्वकर्मा यांना  ‘कारखान्यावरचा सुरेश’ म्हणवून घ्यायला अधिक आवडतं. विश्वकर्मा यांनी लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विश्वकर्मा गावातून  मुंबईत आले आणि त्यांच्या स्ट्रगलला सुरुवात झाली. या दरम्यान त्यांनी स्टेज शो, मालिका, चित्रपटांपासून ते अगदी पथनाट्यांमध्येही काम केलं. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती नागराजच्या सैराट चित्रपटामुळे. फँड्रीवेळी नागराजने चंक्याच्या पात्रासाठी विचारणा केली होती. पण, विश्वकर्मा यांचे व्यक्तिमत्व भारदस्त असल्यामुळे त्यांना चंक्याऐवजी पाटलाची भूमिका देण्यात आली. त्यानंतर तब्बल तीन-चार वर्षानंतर ‘सैराट’च्या निमित्ताने नागराज आणि विश्वकर्मा यांची भेट झाली. तेव्हा माझ्या चित्रपटात केवळ तुम्हीच पाटलाची भूमिका साकारणार असल्याचे नागराजने त्यांना सांगितले.

आपलं नशीब आजमवण्यासाठी खेड्यातून शहराकडे वळलेल्या विश्वकर्मांनी ‘रेगे’, ‘महिमा खंडोबाचा’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शहरातील कलाकारांपेक्षा गावातील कलाकारांचा स्ट्रगल पाचपटीने जास्त असतो, असे विश्वकर्मा यांचे मत आहे. खेडेगावातून शहराकडे जाणाऱ्या कलाकारासमोर राहायचं कुठं, खायचं काय, कपडे कशाप्रकारचे घालायचे, पुन्हा बोलीभाषेत येणारे अडथळे या गोष्टींमध्ये त्यांचे स्ट्रगल पाचपटीने अधिक वाढते, असे त्यांनी सांगितले.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com