ग्रँट रोड परिसरातील छाप्यात सहा जणांना अटक

तिकीटबारीवर सध्या ‘झिंग झिंग झिंगाट’ चाललेला ‘सैराट’ हा चित्रपट सर्वाच्याच पसंतीला उतरला आहे. तिकीटविक्रीचे नवीन विक्रम करणाऱ्या या चित्राच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध असल्याची तक्रार निर्माता आणि दिग्दर्शक यांनी केल्यानंतर आता पोलिसांनी स्वामित्त्व अधिकार कंपन्यांच्या मदतीने कारवाईची सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथे पोलिसांनी मारलेल्या छाप्यात पोलिसांनी या चित्रपटाच्या बनावट सीडी आणि इतर साहित्य जप्त केले आहे. त्याचप्रमाणे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

‘सैराट’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांचीही पसंती मिळाली आहे. तिकीटबारीवरही हा चित्रपट चांगली गर्दी खेचत आहे. या पाश्र्वभूमीवर या चित्रपटाच्या बनावट सीडीज् विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळले होते. त्यानंतर निर्माता आणि दिग्दर्शक यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अखेर स्वामित्त्व अधिकार कंपन्यांची मदत घेत गुरुवारी ग्रँट रोड येथे छापा टाकला. या छाप्यात सुरेंद्र घोसाळकर, हाशिम खान, शहबाज खान, मुश्ताक खान, इब्नेश शहा आणि बबलू उर्फ अब्दुल शहा यांना अटक करण्यात आली. या सहा जणांकडून पोलिसांनी ‘सैराट’च्या २३ बनावट सीडीज्, तीन संगणक आणि साडेसात हजारांहून रिकाम्या सीडीज् ताब्यात घेतल्या. या आरोपींविरोधात डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या कारवाईत गुन्हे शाखा नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम काकड, पोलीस निरीक्षक शिवाजी माने आदींनी सहभाग घेतला.