‘झक्कास’ अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर या दोन्ही नवोदित कलाकारांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘मिर्झिया’ या चित्रपटाचीच सध्या चर्चा आहे. या चित्रपटाद्वारे हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सैयामी खेरने चित्रपटसृष्टीतील काही बाबींवरुन पडदा उचलला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपणही ‘कास्टिंग काउच’ चा शिकार झाल्याचा खुलासा सैयामीने केला आहे. ते दिवस आठवले तरीही अस्वस्थ वाटते, असेही तिने स्पष्ट केले आहे.

‘जर तुम्ही एखाद्या कलाकाराचे अपत्य असाल, किंवा सेलिब्रिटी कुटुंबाशी तुमचा संबंध असेल, तर तुम्हाला चित्रपटसृष्टीत काम मिळवणं सोपं होऊन जातं. पण, चित्रपटसृष्टीबाहेरील अनेकांना इथे स्वत:ची जागा बनवण्यासाठी झटावं लागतं. किंबहुना पहिला चित्रपट मिळवण्यासाठीसुद्धा अनेकांना काही बाबतींत तडजोड करावी लागते’, असे म्हणत सैयामीने तिला सुरुवातीच्या काळात ‘कास्टिंग काउच’ला सामोरे जावे लागले होते असा खुलासा केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैयामीचे काही नातेवाईक चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. पण, असे असूनही तिलाही या क्षेत्रात येण्यासाठी खस्ता खाव्या लागल्या आहेत. ‘मला अनेक दिग्दर्शकांनी भूमिकांसाठी नाकारले, काहींनी मला तडजोड करण्यासाठी विचारले. मला मात्र त्यावेळी काही समजेनासेच झाले होते’, असे सैयामीने सांगितले. ‘मी सोळा वर्षांची असल्यापासून मॉडलिंग क्षेत्रात आहे. त्यामुळे इथे नाना परिंच्या व्यक्ति माझ्या वाट्याला येणार हे मी जाणून होते. त्यामुळे अशा अनेक प्रसंगांना तोंड देत मी चुकीच्या लोकांना टाळत गेले, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं’ असे सैयामीने स्पष्ट केले आहे. सैयामीशिवाय राधिका आपटे आणि सुवरिन चावला या अभिनेत्रींनासुद्धा ‘कास्टिंग काउच’चा सामना करावा लागला होता असे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे. दरम्यान ‘मिर्झिया’ या चित्रपटासाठी सैयामी सध्या फार उत्सुक असून या चित्रपटातील तिच्या लूकची सध्या चित्रपटवर्तुळात चर्चा आहे. ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’ असे सुपरहिट चित्रपट देणारे राकेश ओमप्रकाश मेहरा ‘मिर्झिया’चे दिग्दर्शन करत आहेत.