गेल्या काही वर्षांमध्ये रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींनी छोटय़ा पडद्यावरही आपला ठसा उमटवला आहे. अरूणा इराणी रीना रॉय, अनिता राज, पूनम धिल्लाँ, रति अग्निहोत्री अशा कित्येक हिंदी चित्रपट अभिनेत्रींनी छोटय़ा पडद्यावरील मालिकांमधून काम करणे पसंत केले. या मांदियाळीत आता ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका सलमा आगा यांचाही समावेश झाला आहे. ‘अँड टीव्ही’वरील आगामी ‘मेरी आवाज ही पेहचान है’ या मालिकेत एका गायिके च्या भूमिकेत सलमा आगा दिसणार असून त्यांच्याबरोबर दीप्ती नवल आणि झरीना वहाब या समकालीन अभिनेत्रीही महत्वाच्या भूमिकेत आहेत.
‘मेरी आवाज ही पेहचान है’ ही मालिका सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. या मालिकेतील कथा प्रामुख्याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि सुप्रसिध्द पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या नात्यावरून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मालिकेविषयी उत्सूकता आहे. मालिकेतील या दोघींच्या मध्यवर्ती भूमिकांमध्ये पहिल्यांदाच दीप्ती नवल आणि झरीना वहाब या दोन दिग्गज अभिनेत्रींमधली जुगलबंदी पहायला मिळणार आहे. याशिवाय, याच मालिकेत नयनतारा देवी या गायिकेच्या भूमिके त सलमा आगा यांचा प्रवेश झाला आहे. ‘निकाह’, ‘पती, पत्नी और तवायफ’, ‘कसम पैदा करनेवालेकी’ सारख्या चित्रपटांमधून सलमा आगा यांनी काम के ले असून ‘दिल के अरमाँ’ सारख्या दर्दभऱ्या गाण्यांची गायिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. नयनतारा देवी ही या मालिकेतील व्यक्तिरेखा एका प्रथितयश गायिकेची आहे. नयनतारा देवींचा या मालिकेची नायिका कल्याणीच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. ज्या पध्दतीने नयनतारा देवी ही व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे ते पाहूनच मी भारावले होते, असे सलमा आगा यांनी सांगितले.