या ना त्या कारणाने यंदाच्या वर्षभरात अभिनेता सलमान खानच्या नावाची चर्चा बी टाऊनमध्ये होतेच आहे. ‘सुलतान’ ला मिळालेल्या यशानंतर चर्चेत असणारा ‘भाईजान’ सलमान सध्या गाजत आहे तो ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो च्या १० व्या पर्वाच्या प्रोमोमुळे. चाहत्यांच्या मनावर एक अनोखी छाप उमटवणारा सलमान आता एका नव्या रुपात सर्वांच्या भेटीला आला आहे. ‘बिईंग सलमान द ऑफिशिअल गेम’ या खेळाच्या माध्यमातून सलमान आणखी एका रुपाने चाहत्यांच्या गराड्यात राहणार आहे.
सलमानने नुकतेच त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबतचे ट्विट केल्यामुळे या गेमबद्दलची उत्सुकता वाढली होती. सलमान आणि त्याच्या नावाभोवती असणाऱ्या वलयाची चर्चा पाहता ‘पोकेमॉन गो’ नंतर बॉलिवूडच्या सुलतानच्या नुसत्या नावानेच या गेमची क्रेझ वाढणार असेच दिसत आहे. या गेमच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच सलमान चाहत्यांना हा गेम खेळण्यासाठी बोलावत आहे. त्याच्या चित्रपटांप्रमाणेच हा गेमही ‘अॅक्शन’ने परिपूर्ण असेल असेही सलमानने आवर्जून सांगितले. चुलचुल पांडे, सुलतान, प्रेम अशा विविध भूमिकांच्या माध्यमातून सिनेरसिकांना भुरळ घातल्यानंतर आता हा अॅनिमेटेड सलमान किती जणांना भावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत असून झु झु या चिनी अभिनेत्रीचीसुद्धा या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे.