काळवीट शिकार प्रकरणात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याच्या आरोपातून जोधपूर न्यायालयाने बुधवारी सलमानची निर्दोष सुटका केली. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा सलमानवर आरोप होता. सलमानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा आणि आर्म्स अॅक्टमधील कलम ३/२५ व ३/२७ या कलमांखाली गुन्हा दाखल होता.यातील आर्म्स अॅक्टच्या गुन्ह्यातून न्यायालयाने सलमानला दोषमुक्त केले. सलमानने शिकार करताना अमेरिकन बनावटीची रिव्हॉल्वर आणि बंदुकीचा वापर केल्याचा आरोप होता. सलमानला दोषमुक्त केल्याचे वृत्त समजताच न्यायालयाबाहेर जमलेल्या सुलतानच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

जोधपूर न्यायालयाने सलमान खानला निर्दोष ठरविल्यानंतर सध्या ट्विटरवर सलमान खान हॅशटॅग ट्रेंण्ड करताना दिसत आहे. एका नेटिझन्सने काळवीटने स्वत:ला गोळी मारुन घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. सलमानने काळवीटची शिकार केली नसून काळवीटनेच आत्महत्या केली होती, या आशयाच्या ट्विटने या नेटिझन्सने सलमानवर टीका केल्याचे दिसते. तर सलमान खानच्या निर्दोष सुटकेनंतर ह्युमनबिंग बास्केटबॉल किंवा टेनिस खेळाडू नसूनही कोर्टवर सातत्याने यशस्वी ठरत असल्याचे सांगत एका नेटिझन्सने सलमानची फिरकी घेतली आहे. क्रिती नावाच्या एका नेटिझन्सने सलमानच्या सुटकेवर नाराजी व्यक्त करताना माझ्या हातात असते तर सलमानच्या बेअक्कल समर्थकांना गॅस चेंबरमध्ये घालून ठेवले असते, असे म्हटले आहे. एका नेटिझन्सने भाईजान आता खऱ्या अर्थाने लग्न करण्यास तयार झाला असेल, असे ट्विट करत सलमानच्या लग्नाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

२ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर २००७ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने काळवीट शिकारप्रकरणी सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.