गेल्या १८ वर्षांपासून सलमान खानसोबत जो त्याच्या सावलीसारखा उभा असतो असा त्याच्या अंगरक्षक शेरा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शेराने मारामारी आणि बंदुक दाखवून धमकवल्याचा आरोप सध्या त्याच्यावर आहे. या आरोपावरुनच शेराला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पीडित अख्तर कुरेशी याने शेराने त्याला बंदुकीने मारल्याचा आरोप केला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शेराने त्याच्या बचाव पक्षात केलेल्या विधानानुसार त्याच्यावर ज्या गोष्टींचा आरोप करण्यात आला ती फक्त बाचाबाची होती. कोणत्याही प्रकारची मारामारी झाली नव्हती.

शेरा म्हणाला की, ‘मंगळवारी असं काहीच झालं नव्हतं. मी कोकिलाबेन रुग्णालयात माझ्या एका मित्राला भेटायला गेलो होतो. यानंतर मी पॉपटेट्सला गेलो. इथे माझी फोनवर बाचाबाची झाली, पण कोणत्याही प्रकारची शारीरिक मारामारी किंवा भांडण झालं नव्हतं. पोलीस घरी आले आणि मला डीएन नगर पोलिस स्थानकात घेऊन गेले. मला नाही माहित त्यांनी माझ्याविरुद्ध कोणता गुन्हा दाखल केला होता.’ शेराच्या विरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याखालीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय धारा ३२६, ५०३ आणि ५०४ हे गुन्हेही लावण्यात आले आहेत. शेराच्या व्यतिरिक्त अजून चौघांना अटक करण्याची शक्यता आहे.

शेरा गेली १८ वर्ष सलमानच्या अंगरक्षकाचे काम करत आहे. सलमानला कुठेही जायचे असेल तिकडे शेरा एक दिवस आधीच पोहोचतो. सगळी व्यवस्था योग्य आहे की नाही याची पाहणी झाल्यानंतर सलमान तिथे पोहोचतो. शेराने एकदा सांगितलेही होते की, शेवटच्या क्षणापर्यंत तो सलमानसोबतच काम करणार. २०११ मध्ये सलमानने बॉडिगार्ड नावाचा सिनेमा केला होता. त्याने हा सिनेमा शेराला समर्पित केला होता. यावरुनच सलमान आणि शेराचे संबंध किती चांगले आहेत हे कळून येतं. या सिनेमात सलमानने एका अंगरक्षकाची भूमिका साकारली होती. या सिनेमातल्या एका गाण्यात शेराही दिसून येत आहे.