अभिनेता सलमान खान त्याच्या दिलेरपणासाठी जितका चर्चेत असतो तितकाच तो त्याच्या ‘दबंग’ गिरीसाठीही वादाच्या भोवऱ्यात अडकतो. अनेक विवादास्पद प्रकरणांमध्ये अडकलेल्या भाईजान सलमानविरुद्ध सहसा चित्रपटसृष्टीत कोणीही वाकड्यात न जाणेच योग्य समजतात. पण महेंद्रसिंग धोनीची हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी हिने सलमानबद्दल केलेल्या एका वक्तव्यासाठी सध्या बी टाऊनमध्ये आणि सोशल वर्तुळात यासंबंधीच्या चर्चेला प्रचंड उधाण आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सपना ‘बिग बॉस’ आणि सलमानविषयी फार बोलली. सलमान खान इतरांचा चुकीचा वापर करुन घेतो असे म्हणत सपनाने सलमानवर शाब्दिक हल्ला चढवला. माझ्यासाठी सलमानचे काहीही महत्त्व नाही असे सांगत सलमानविरोधात बोलल्यामुळे मला अनेकांनी सावध केले होते. आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ‘मागच्या चार वर्षांत सलमानला मी जराही घाबरलेली नाही. मी एका माकडाला घाबरू इच्छितही नाही’, असे सपना म्हणाली. सलमानने सुत्रसंचालन केलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो मधील अनुभव हे विचारले असता, ‘अतिशय वाईट’ असे सपनाने सांगितले. ‘त्या शोमध्ये आमच्याकडे एक उपद्रवी सुत्रसंचालक होता. जो लोकांचा अपमान करायचा. त्याच्या चित्रपटामध्ये काम मिळवण्याच्या हेतूने अनेक जण त्याला फार महत्त्वही देतात’, असे म्हणत सलमानच्या चित्रपटांतून भुमिकांची तुलना सपनाने माकडाशी केली. त्याच्या चित्रपटांमध्ये काहीही नसते, असेही ती म्हणाली. सपना ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वातील एक स्पर्धक होती. या शो दरम्यानही ती सलमानचा विरोध नोंदवतांना दिसली होती. सपनाने सलमानविरोधात व्यक्त केलेल्या या विधानांमुळे चित्रपट वर्तुळात एकच चर्चा रंगत आहे. दरम्यान नुकतेच गायक अरिजित सिंग आणि अभिनेता सलमान खान यांच्यात झालेल्या वादामुळेही या संबंधीच्या चर्चेला उधाण आले होते.