बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याची चर्चा होती. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास केल्या जाणा-या विरोधावरून सलमानने राज यांना फोन केल्याचे म्हटले जात होते. मात्र, राज ठाकरे आणि सलमान यांची भेट झालेली नाही. तसेच, फोनवरूनही या दोघांमध्ये कोणताच संवाद न झाल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने स्पष्ट केले आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे त्यास विरोध केला जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आम्ही पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला होता. आज भारतात एकही पाकिस्तानी कलाकार तुम्हाला पाहावयास मिळणार नाही. ते पाकिस्तानमध्ये जावो किंवा दुबईला महत्त्वाचं काय की ते आज या देशात नाहीत. आमचा विरोध अद्याप मावळेला नाही. झी जिंदगी वाहिनीवरील पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करणा-या सुभाष चंद्राजी यांचा मला आदर वाटतो. त्याचसोबत पाकिस्तानी कलाकारांना ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ आणि ‘बिग बॉस’मध्ये न घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पहलाज निहलानी आणि कलर्स वाहिनीचेही आभार मानतो. रेडिओ मिर्चीने आम्हाला पाठिंबा देऊन आतिफ असलमचे कार्यक्रम थांबवल्याबद्दल त्यांचेही आभार. ज्यावेळी पाकिस्तान त्यांचे दहशतवादी हल्ले थांबवेल त्याचवेळी आम्ही मैत्रीचा हात पुढे करू. उरी हल्ल्यानंतर एकाही पाकिस्तानी कलाकाराने दुःखही व्यक्त केले नाही. आम्ही कला आणि चित्रपटांना विरोध करत नसून पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत आहोत.
पाकिस्तानी कलाकार असलेल्या प्रत्येक चित्रपटाला विरोध करण्याच्या मनसेच्या भूमिकेबाबत विचारले असता अमेय म्हणाले की, करण जोहर, शाहरुख खान यांच्यासोबत आमचे शत्रुत्व नाही. आमचा मुद्दा पाकिस्तानी कलाकारांशी आहे. पाकिस्तानी कलाकारांनी पॅरिस हल्ल्यावेळी त्याचा निषेध व्यक्त केला होता. पण उरी हल्ल्याचे काय? ज्या भारतीय चित्रपटात पाकिस्तानी कलाकार असेल त्या प्रत्येक चित्रपटास आम्ही विरोध करू. पाकिस्तानमध्ये भारतीय वाहिन्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. दिग्दर्शक कबीर खान याच्यासोबत पाकिस्तानमध्ये काय झाले ते तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. तसाच अनुभव सोनू निगमच्याही तेथील एका कार्यक्रमावेळी आलेला. राजू श्रीवास्तव आणि अभिजीत यांनी तेथील त्यांचे कार्यक्रम रद्द केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. याप्रकरणी आता आमच्याकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही अमेय खोपकर म्हणाले.