सलमान खान आणि दर चित्रपटागणिक त्याची वाढत जाणारी कोटय़वधींची कमाई हे इतके घट्ट समीकरण आहे की मोठे निर्माते मग चित्रपटाचे असोत वा रिअ‍ॅलिटी शोचे.. मोठय़ात मोठा धनादेश त्याला डोळे झाकून द्यायला तयार आहेत. ‘सुलतान’ या सलमानच्या यावर्षीच्या पहिल्या चित्रपटानेही तिकीटबारीवर घसघशीत कमाई केली आहे. ‘सुलतान’ हा अभिनयाच्या आणि पैशाच्या दोन्ही बाबतीत त्याला समाधान देणारा चित्रपट ठरला आहे. त्यामुळे हा चित्रपट तो सहजी विसरू शकणार नाही, हे वास्तव ‘बिग बॉस’च्या नव्या दहाव्या पर्वाच्या निमित्ताने समोर आले आहे. नाही नाही म्हणता सलमानने दहाव्या पर्वाचीही धुरा खांद्यावर घेतली आहे आणि यावेळी ‘बिग बॉस’साठीही त्याने आखाडा तयार करून घेतला आहे. तो या शोच्या आखाडय़ात उतरणार हे निश्चित झाल्यापासून त्याच्या शोमध्ये असण्याबद्दल नाही तर तो शोमध्ये दिसण्यासाठी वाहिनीने किती पैसे मोजलेत, याचीच चर्चा सुरू झाली आहे. याआधीच्या पर्वासाठी सलमान खानने शोच्या एका भागासाठी पाच ते सहा कोटी रुपये घेतले होते. आता दहाव्या पर्वासाठी सलमानने याही मानधनात ३० टक्क्यांची वाढ मागितली आहे. सलमानची ही मागणी पूर्णही झाली आहे आणि त्यामुळेच बॉलीवूडचा हा ‘सुलतान’ कलर्सच्या या ‘बिग बॉस’ आखाडय़ात उतरणार आहे. प्रत्येक भागासाठी सहा कोटी रुपये घेणाऱ्या सलमानने त्याहीवेळी शोमध्ये निर्माते आपल्याला खूप कमी मानधन देतात अशी गमतीशीर तक्रार केली होती. आता ३० टक्के वाढ दिल्यानंतरही त्याची ही तक्रार संपली म्हणायची की ‘टय़ुबलाइट’ तिकीटबारीवर पेटल्यानंतर पुन्हा नव्या वर्षी नव्या पर्वासाठी मानधनाचा नवा आकडा तो सांगणार, हे त्याचे तोच जाणे.