‘चला हवा येऊ द्या’मध्ये सलमानचे मराठी धूमशान

सलमान खान मराठी चित्रपटाची निर्मिती करणार ही गोष्ट दर काही महिन्यांनी नव्याने चर्चिली जाते. ‘सुलतान’च्या निमित्ताने प्रसिध्दीमाध्यमांसमोर आलेल्या सलमान खानला पुन्हा एकदा याविषयी विचारणा होते आहे. मात्र मराठी चित्रपटाच्या निर्मितीविषयीचे गुपित कायम ठेवत सलमानने आपण पुन्हा एकदा मराठी चित्रपटात काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे मनमोकळेपणाने कबूल केले. हिंदी चित्रपटांच्या प्रसिध्दीसाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर येणाऱ्या हिंदी ‘स्टार’ कलाकारांच्या मांदियाळीत सलमान खानचे नावही सामील झाले असून याच सेटवर त्याने रितेश देशमुख याला यासाठी गळ घातली असल्याचेही सांगितले.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या आपल्या यावर्षीच्या पहिल्या चित्रपटासाठी सलमान खानने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावली होती. सलमानवरही दोन भाग चित्रित करण्यात आले.

चित्रिकरणासाठी पाच ते सहा तास सेटवर असलेल्या सलमानने सगळ्यांशी मराठीतूनच संवाद साधल्याने एकूणच तिथला ‘सुलतानी’ माहौलही मराठमोळा झाला होता. सलमानने याआधी रितेश देशमुख बरोबर ‘लय भारी’ या चित्रपटासाठी एक दृश्यात काम केले होते. त्याच्यावर आणि रितेशवर चित्रित झालेले हे दृश्य चांगलेच लक्षात राहिले. आता पुन्हा एकदा मराठीत छोटय़ा का होईना भूमिकेतून काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. यासाठी त्याने पुन्हा एकदा आपल्या मित्राला रितेशलाच विनंती केली आहे. रितेशच्या आगामी ‘शिवाजी’ या चित्रपटात छोटीशी पण चांगली भूमिका करणार असल्याचे त्याने सांगितले. मराठी भाषा चांगली बोलता येत नसल्याने मोठी भूमिका करणे शक्य नाही. पण ‘शिवाजी’ चित्रपटात छोटी भूमिका करायला मिळणे हेही आपल्यासाठी भाग्य असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

सलमानच्या चित्रपटांचा आजवरचा प्रवास गाण्यांच्या माध्यमांतून उलगडून दाखवण्यात आला. त्याच्या प्रत्येक गाण्यांवर छोटय़ा मुलांनी केलेले नृत्य पाहून आनंदलेल्या सलमानने यावेळी पुन्हा एकदा ‘झिंगाट’ वर ठेका धरला. ‘सैराट’च्या यशाची दखल बॉलीवुडच्या या सुलतानालाही घ्यावी लागली. आमचे चित्रपट देशभर प्रदर्शित होतात तेव्हा कुठे जाऊन आम्हाला २०० कोटी रुपयांचा व्यवसाय करता येतो. मात्र ‘सैराट’ हा प्रादेशिक चित्रपट आहे.

केवळ एका राज्यात मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १०० कोटी रुपये कमाई करावी ही खूप मोठी गोष्ट आहे. बॉलीवुडने यावरून धडा घेतला पाहिजे, असेही तो म्हणाला. आपल्याकडे अजूनही चित्रपटगृहांची संख्या खूप कमी आहे. त्यांची संख्या वाढली आणि तिकीटांचे भाव कमी झाले तर आणखी चांगला व्यवसाय करता येईल, असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरचे सलमान खानचे हे मराठी धूमशान ४ आणि ५ जुलैला ‘झी मराठी’वर पहायला मिळणार आहे.