अभिनेता सलमान खान माझ्यासाठी सर्वस्व आहे. तो माझा मार्गदर्शक आणि गुरू असून जर तो नसता तर मी संगीतकारच झालो नसतो, अशी भावना हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार हिमेश रेशमिया याने व्यक्त केली.
‘तेरा सुरूर’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हिमेश मंगळवारी नवी दिल्लीमध्ये आला होता. त्यावेळी एका कार्यक्रमात तो म्हणाला, सलमान माझ्यासाठी मार्गदर्शक, गुरू, मोठा भाऊ असं सगळंच आहे. त्याने मला संधी दिली नसती, तर मी संगीतकार झालोच नसतो. मी माझ्या निर्मितीच्या कामामध्ये गुंतलो होतो, पण त्याने संधी दिल्यामुळे माझा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला, असे हिमेशने सांगितले.
आतापर्यंत सर्वात लोकप्रिय झालेली माझी ६५० गाणी मी सलमान खानला समर्पित करीत असल्याचेही त्याने सांगितले. अॅक्शन हिरो या नव्या अंदाजात हिमेश ‘तेरा सुरूर’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अॅक्शन हिरोची भूमिका साकारण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती खूपच आवश्यक होती. यासाठीही मी सलमान खानचेच मार्गदर्शन घेतल्याचे त्याने सांगितले.