अभिनेता सुनील शेट्टीकडून पाठराखण
अभिनेता सलमान खानने महिलांच्या विरोधात अपमानस्पद वक्तव्य केले नाही. प्रसार माध्यमांनी ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी त्याच्या विधानांचा वेगळा अर्थ काढून बातमी प्रसारित केली आहे. मुळात सलमान हा महिलांचा आदर आणि सन्मान करणारा अभिनेता असल्याचे सांगून अभिनेता सुनील शेट्टीने त्याला पाठीशी घातले.
खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनील शेट्टी नागपुरात आला असता तो पत्रकारांशी बोलत होता. चित्रपटात किंवा कुठल्याही सार्वजानिक कार्यक्रमात सलमान खान सावधपणे विधान करीत असतो. मात्र, एखादवेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काही वेडेवाकडे बोलत असला तरी त्याच्या मनात मात्र काहीच राहत नाही. महिलांविषयी त्याला आदर असून तो कधीच आक्षेपार्ह विधान करू शकत नाही. त्याने केलेल्या विधानाचा प्रसार माध्यमांनी विपर्यास केला आहे. सलमान खानने काय म्हटले आहे आणि त्याच्या भावना काय होत्या हे समोर आले पाहिजे. केवळ बदनाम करण्यासाठी आरोप करणे चुकीचे असल्याचे शेट्टीने सांगून त्याची पाठराखण केली.
‘उडता पंजाब’च्या संदर्भात बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, या चित्रपटाबाबत न्यायालयाने हिरवा संकेत दिला आहे, त्यामुळे या चित्रपटावर उगाच वाद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही. ‘सेन्सॉर बोर्ड’चे काम केवळ प्रमाणपत्र देण्याचे असून त्यांना तेवढाच अधिकार आहे. चित्रपटात काय दाखवावे आणि काय दाखवू नये हे निर्माता आणि दिग्दर्शकाला कळत असल्यामुळे त्यांना त्यांच्या अधिकाराचा उपयोग करू दिला पाहिजे. चित्रपट ‘सेन्सॉर बोर्ड’ने यापूर्वी अनेक चित्रपटाबाबत वाद निर्माण केले आहे. वाद निर्माण झाले की त्याचा परिणाम चित्रपटावर आणि अभिनेत्यावर होत असतो. राज्य किंवा केंद्र सरकारने चित्रपट किंवा चित्रपट गृहामध्ये सादर होणाऱ्या कलाकृतींच्या मंजुरीसाठी जे मंडळ तयार केले असताना त्यांच्या नियमात बदल करण्याची गरज आहे. सेन्सॉर बोर्डला जे अधिकार आहेत, त्याचा उपयोग त्यांनी केला पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची शेट्टी याने प्रशंसा केली असून त्यांना दृष्टी आहे. शहराने राज्याला मुख्यमंत्री दिल्यामुळे या शहराचा विकास चांगला होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. राजकारणात प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही. चित्रपट क्षेत्रात काम करीत असताना समाजातील उपेक्षितांसाठी जे काही करण्यात येईल ते करण्याचा प्रयत्न करीत असतो. युवक ही या देशाची मोठी शक्ती असल्यामुळे त्यांनी व्यसाधीनतेकडे न जाता आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन त्याने केले.