मराठी सिनेमा, त्यातला आशय आणि तो सादर करण्याची पद्धत गेल्या काही महिन्यात कमालीची बदलते आहे. पण तो सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो अशी अनेकांची ओरड होती. हाच मुद्दा लक्षात घेऊन आपला सिनेमा अधिक चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा चंग बांधत अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पुढाकार घेतला तो त्यांच्या आगामी रुबिक्स क्यूब या सिनेमाच्या निमित्ताने. या भव्य सिनेमाचा फर्स्ट लुक आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याचं विशेष आकर्षण होतं ते यारोंका यार सलमान खान याची उपस्थिती.
महेश मांजरेकर यांचा चांगला मित्र असलेल्या सलमान खान च्या हस्ते सिनेमाच्या संगीताचं अनावरण करण्यात आलं.

सलमानची तथाकथित प्रेयसी लूलिया वंतूर हिने या सोहळ्यात सादर केलेलं नृत्यही उपस्थितांची दाद मिळवून गेलं. या भव्य सोहळ्यासाठी मराठी सृष्टीतलं अवघं तारांगण अवतरलं होतं. अनेक नव्या तरुण कलाकारांसह दिग्गज कलावंतांनाही आपल्या उपस्थितीने या म्युझिक लॉन्चला चार चाँद लावले होते. रंजक कथा, उत्तम दिग्दर्शन आणि आकर्षक लोकेशन्स हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. ‘रुबिक्स क्युब’ या सिनेमाची कथा नावाप्रमाणेच वेगळी आहे. ही संपूर्ण कथा परदेशात घडते. आजवर फक्त बॉलिवूड सिनेमांमध्ये बघितलेलं युरोपचं निसर्ग सौंदर्य ‘रुबिक्स क्युब’मुळे मराठी सिनेमातही बघता येईल. हा संपूर्ण सिनेमा स्लोव्हेनिया, इटली, आणि स्वित्झर्लंड येथे चित्रित केला आहे.

मृण्मयी देशपांडे, गश्मीर महाजनी, सुरभी भोसले आणि सिद्धांत मुळ्ये या नव्या दमाच्या कलाकारांसह किरण यज्ञोपवीत, संदीप पाठक सारखे अनुभवी आणि मेधा मांजरेकर व महेश मांजरेकर या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे तर फ्रेश संवाद इरावती कर्णिक यांनी लिहिले आहेत. युरोपचं निसर्गसौंदर्य,कलाकारांचा अभिनय सिनेमाची कथा आणि भव्य संगीत हि या सिनेमाची बलस्थानं आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून नव्या दमाचा संगीतकार विशाल मिश्रा हा मराठी चित्रसृष्टी मध्ये पदार्पण करत आहे. सिनेमाचे निर्माते अविनाश अहाले याबद्दल बोलताना सांगतात की, मराठी सिनेमा बदलाच्या दिशेने जात असताना त्यात माझा हातभार लागणं हे मी माझं सुदैव समजतो. तर आधीच्या सगळ्या सिनेमांपेक्षा काही तरी वेगळं करावं ही माझी इच्छा होती.

salman-khan

नशिबाने तशी कथा लिहिली गेली. आणि ती कथा सत्यात उतरवण्यासाठी निर्मात्याचं पाठबळही मला मिळालं. हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्वाकांक्षी आहे असं मत महेश मांजरेकर यांनी सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या वेळी व्यक्त केलं.
अहालेस मूवी मॅजिक आणि महेश मांजरेकर मूवीस यांची निर्मिती आणि जी. बी. एंटरटेन्मेन्ट प्रा. लि. यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाची भव्यता बहारदार लोकेशन्स आणि दमदार स्टारकास्ट आणि सलमान च्या खास शुभेच्छांमुळे या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.