बॉलिवूडचा सुलतान सलमान खानने रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना एक लाख एक हजार रुपये देण्याचे वचन दिले होते. आता तो त्याच्या या वचनाची पूर्तता करताना दिसत आहे. सलमान खान यावर्षी रिओ ऑलिम्पिकसाठी सदिच्छा दूत होता. त्याने प्रत्येक खेळाडूला एक लाख एक हजार रुपये देण्याचे वचन दिले होते.

आईओचे महासचिव राजीव मेहता म्हणाले की, ‘सलमान खान याने मला सोमवारी एक पत्र पाठवले आहे. ज्यात त्याने रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचा सदिच्छा दूत बनवल्याबद्दल आभार मानले. शिवाय रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे फोन नंबर देण्यास सांगितले.’

मेहता पुढे म्हणाले की, ‘सलमान प्रत्येक खेळाडूला एक लाख एक हजार रुपये देणार आहे. तो आईओए यांच्या मार्फत रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना धनादेश देणार आहे. तो एवढा मोठा सुपरस्टार असूनही त्याने शिष्ठाचाराचे पालन केले. आम्हाला फार आनंद आहे की आम्ही त्यांची सदिच्छा दूत म्हणून निवडले.’

भारताचे महान अॅथलिट मिल्खासिंग यांनीदेखील या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. माझा सलमान खानला विरोध नसला तरी रिओ ऑलिम्पिकसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीचीच निवड झाली पाहिजे होती, असे स्पष्ट मत मिल्खासिंग यांनी व्यक्त केले होते. योगेश्वर दत्त यानेदेखील शनिवारी या निर्णयाबद्दल ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती. ‘ऑलिम्पिक पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती होण्यात सलमानचे काहीही योगदान नाही. प्रत्येकाला चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा अधिकार आहे. परंतु ऑलिम्पिक हे चित्रपट लोकांपर्यंत पोहचवण्याचे माध्यम नाही, अशा शब्दांत योगेश्वर दत्तने आपली नाराजी व्यक्त केली होती