बॉलिवूड कलाकारांमध्ये सध्या पुनरागमनाचे वारे वाहत असतानाच चाहत्यांना मात्र एका वेगळ्याच चित्रपटासंबंधीची उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. पण, सध्या मात्र सलमानचा हा चित्रपट चर्चेत आला आहे ते म्हणजे अभिनेता शाहरुख खानमुळे. शाहरुख आणि सलमान खान ही जोडी या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना एकत्र पाहता येणार आहे. शाहरुखने नुकतेच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेच्या भागाच्या चित्रिकरणासाठी हजेरी लावली होती.

शाहरुख आणि सलमानच्या एकत्र येण्याने चित्रपटाच्या सेटवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते. पण, ‘ट्युबलाइट’चे दिग्दर्शक कबीर खान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. गेल्या बऱ्याच काळापासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असून किंग खानही आता चित्रपटाच्या टीमचा एक भाग झाला आहे. हाच आनंद कबीर खानने त्याच्या पोस्टमधून शेअर केला आहे. ‘मेरे करन-अर्जुन आएंगे…आसमान का सीना चीर के आएंगे’ असे लिहिलेली एक ओळही या नोटवर पाहायला मिळत आहे.

Call sheet for the day Karan Arjun got back after 20 yrs SK & SRK #tubelight #eid2017

A photo posted by Kabir Khan (@kabirkhankk) on

दरम्यान, सलमान त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर किंग खानही त्याच्या ‘रईस’ आणि इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, भारत आणि चीन दरम्यान १९६२ मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. या चित्रपटात एका सुरेख प्रेमकहाणीचे चित्रण करण्यात आले आहे. सलमानच्या इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटातील त्याची भूमिका फार वेगळी असणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सलमानचा ‘ट्युबलाइट’ चित्रपट येणाऱ्या काळात अनेक कारणांनी गाजणार असेच दिसत आहे.