सलमानचा ‘ट्युबलाइट’ यंदा बॉक्स ऑफिसवर तेवढा प्रकाश नाही पाडू शकला. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाची जोडी म्हणजेच दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान यावेळीसुद्धा तीच कमाल दाखवतील अशी प्रेक्षकांकडून अपेक्षा होती. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटासाठी संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ‘ट्युबलाइट’ पहिल्या दिवशीही विशेष कमाई करू शकला नाही. ईदच्या मुहूर्तावर जेव्हा बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान आपल्या नवीन चित्रपटातून पडद्यावर झळकतो तेव्हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उल्लेखनीय कमाई करतो. मात्र यावेळी त्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘ट्युबलाइट’ पहिल्या दिवशी जास्त कमाई नाही करू शकला. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 21.17 कोटींची कमाई करत एकूण 42.32 कोटींचा आकडा चित्रपटाने गाठलाय.

‘दबंग’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 14.50 कोटी म्हणजे ‘ट्युबलाइट’पेक्षा थोडी कमी कमाई केली होती. 2010 मध्ये सलमानचा ‘दबंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. म्हणजे मागील पाच वर्षांचा विचार केला असता ‘ट्युबलाइट’ची पहिल्या दिवसाची कमाई ही सलमानच्या आतापर्यंतच्या चित्रपटांमधील सर्वांत कमी कमाई आहे. 2016 मध्ये ईदच्या एक दिवसाआधी प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 36.54 कोटींची कमाई केली होती. ‘एक था टायगर’नेही 33 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आठवड्याअखेर तरी ‘ट्युबलाइट’ कमाईचा अपेक्षित आकडा गाठू शकेल अशी अपेक्षा आहे.

वाचा : बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सलमानसोबत पोहोचली लूलिया

सलमानच्या ‘ट्युबलाइट’सोबतच दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘दुव्वदा जगन्नधाम’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ‘ट्युबलाइट’पेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘दुव्वदा जगन्नधाम’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 24 कोटींची कमाई केली.

वाचा : कपिलच्या शोमध्ये चहावाल्याच्या वापसीवर किकू म्हणाला…

दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान ‘ट्युबलाइट’च्या निमित्ताने तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. आता ‘ट्युबलाइट’ बॉक्स ऑफिसवर आपल्या कमाईने किती प्रकाश पाडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.