हिंदीतील गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल किंवा अन्य भाषांमध्ये रिमेक तसेच अलीकडच्या काळात दक्षिण भारतीय चित्रपटांचे हिंदी भाषेत रिमेकचे प्रमाण वाढले आहे. परंतु, महेश मांजेरकरांच्या दोन चित्रपटांचे हिंदी रिमेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खानला महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ आणि ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हे दोन्ही मराठी चित्रपट आवडले असून त्यांचे हिंदीत रिमेक करण्यात त्याला रस आहे, असे स्वत: सलमाननेच म्हटले आहे. सलमानला चित्रपट आवडले असून लवकरच या चित्रपटांची घोषणा मोठय़ा थाटामाटाने भव्य कार्यक्रमाद्वारे केली जाणार असल्याच्या वृत्ताला महेश मांजरेकर यानी दुजोरा दिला.
‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’चे तामिळ, तेलुगू, बंगाली या भाषांमध्येही रिमेक करण्यात आले आहेत. ‘अस्तित्व’ चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर महेश मांजरेकरने ‘मी शिवाजी..’ द्वारे मराठीत दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले. ‘मी शिवाजी..’ सुपरहीट ठरला. आता इतक्या वर्षांनंतर सलमान खानला हा चित्रपट आवडला असून सलमानच्या ‘बीईंग ह्यूमन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे हिंदी रिमेक केला जाणार आहे. भव्य प्रमाणात चित्रपटांचे मुहूर्त केले जाणार असून त्यासाठी सलमानसह आपली बोलणी सुरू आहेत, असे मांजरेकरांनी म्हटले आहे.