व्हॉट्स अ‍ॅप व्हिडिओजच्या माध्यमातून कलाकार निवड आणि नेपथ्य रचना

तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, त्यावर बरंच काही अवलंबून असतं. अलीकडे नाटकांच्या प्रसारासाठी समाज माध्यमांचा वापर प्रचंड प्रमाणात होऊ लागला आहे. त्याचा फायदा होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, नाटय़संपदा कलामंच आणि दि गोवा िहदू असोसिएशन यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकाची निर्मितीच ‘डिजिटली’ होत आहे. नाटकातील कलाकारांची निवड, नेपथ्य रचना व्हॉट्स अ‍ॅप व्हिडिओजच्या माध्यमातून होत आहे. या अभिनव संकल्पनेला उत्तम प्रतिसादही लाभतो आहे.

मराठी रंगभूमीवर मलाचा दगड ठरलेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘संगीत मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘नटसम्राट’, ‘बॅरिस्टर’ अशा नाटकांची निर्मिती दि गोवा िहदू असोसिएशनने केली होती. मात्र, १९९७ पासून बंद झालेला संस्थेचा कलाविभाग २० वर्षांनी पुन्हा सुरू करण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी संस्थेचंच ‘संगीत मत्स्यगंधा’ हे नाटक पुनरुज्जीवित करण्याची संकल्पना मांडत त्याची जबाबदारी नाटय़संपदा कलामंचच्या अनंत पणशीकर यांनी स्वीकारली. नाटकाचं दिग्दर्शन संपदा जोगळेकर यांच्याकडे देण्यात आलं. मूळ नाटकात काम केलेले ज्येष्ठ गायक अभिनेता रामदास कामत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांना साहाय्य केलेल्या अशोक पत्की यांनी नव्या नाटकाच्या संगीताची जबाबदारी घेतली. मात्र, गाजलेलं संगीत मत्स्यगंधा पुनरुज्जीवित करताना पारंपरिक पद्धत टाळण्याचं अनंत पणशीकर आणि संपदा जोगळेकर यांनी ठरवलं. त्यानुसार व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक नव्या माध्यमांचा वापर करण्यात येत आहे.

नाटकातील भूमिकांसाठी कलाकार निवडण्यासाठी पुण्या-मुंबईच्या बाहेरील कलाकारांनाही संधी मिळावी या हेतूनं व्हॉट्स अ‍ॅपच्या वापर करण्याचे ठरले. ऑडिशनसाठी व्हॉट्स अ‍ॅप व्हिडिओ पाठवण्याच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिककसह ग्रामीण भागातून आणि अगदी गोवा, अहमदाबाद येथूनही अशा दीडशेहून अधिक कलाकारांनी निवड चाचणीसाठी व्हिडिओज पाठवले. त्यातील ३० जणांची अशोक पत्की, रामदास कामत, वर्षां भावे आणि संपदा जोगळेकर यांनी प्रत्यक्ष निवड चाचणी घेतली. त्यातून नाटकातील भूमिकांसाठी सुयोग्य कलाकारांची निवड झाली. आता नाटकाच्या नेपथ्यासाठीही व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं आहे. राज्यभरातील कला महाविद्यालयांना पत्रंही पाठवण्यात आली आहेत. जुन्या काळातल्या रंगवलेल्या पडद्यांच्याच धर्तीवरचं नेपथ्य नव्या नाटकात वेगळय़ा पद्धतीनं वापरलं जाणार आहे. त्यासाठी नेपथ्यकार सचिन गावकर कला महाविद्यालयांतील कलाकार विद्यार्थ्यांना सोबत घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात गायक अभिनेते आणि नेपथ्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केल्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये अजून वेगळय़ा कल्पना राबवल्या जाणार आहेत.

डिजिटल पद्धतीनं साकारत असलेल्या या नाटकाविषयी निर्माते आणि नाटय़संपदा कलामंचचे संचालक अनंत पणशीकर यांनी माहिती दिली. ‘जुनं नाटक पुनरुज्जीवित करताना संगीत नाटक न पाहिलेली नवी पिढी डोळय़ांसमोर आहे. या पिढीला संगीत नाटकाकडे आकर्षति करायचं, तर त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोललं पाहिजे. तरुणाईची भाषा ‘डिजिटल’ झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच हे नाटक घडतं आहे. या नाटकानं जुन्या प्रेक्षकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल. त्यापेक्षा नवी पिढी संगीत नाटकाच्या परंपरेशी जोडली जाईल. त्यांना संगीत नाटक कसं होतं, हेही कळेल. महत्त्वाचं म्हणजे, पूर्वीच्या काळी नाटकातील पदं ऐकण्यासाठी प्रेक्षक येत होते. आताच्या पिढीला नाटक हवं आहे. जुनं नाटक नव्यानं करताना नाटक आणि संगीत या दोन्हीचा आनंद मिळेल,’ असं त्यांनी सांगितले.

chinmay.reporter@gmail.com