हिंदी चित्रपटसृष्टीचा लाडका ‘संजूबाबा’ म्हणजेच अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होते आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्तच्या भूमिकेमध्ये रणबीर कपूर झळकणार असल्याचे पक्के झाल्यानंतर संजय दत्तच्या आयुष्यातील इतर पात्रांची भूमिका कोण साकारणार याची चांगलीच चर्चा रंगली होती. संजयची लिडींग लेडी म्हणजेच त्याची पत्नी मान्यता दत्त हिच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. आता त्या अभिनेत्रीच्या नावावरून पडदा उठला असून बॉलीवूड अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झा ही संजय दत्तच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. संजूबाबासोबत ‘परिणीता’ आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’ चित्रपटांमध्ये काम करणा-या दियाने काही दिवसांपूर्वीच या बायोपिकमधील कलाकारांच्या यादीत आपलाही समावेश झाल्याचे सांगितले होते. आता चित्रपटाचा निर्माता विधू विनोद चोप्रा याने तिच्या भूमिकेवरून पडदा उचलला आहे.

दिया मिर्झा ही मान्यताची भूमिका साकारत आहे, असे विधूने जयपूर साहित्य उत्सवात आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. हा चित्रपट एक बायोपिक असला तरी तो बायोपिकपेक्षा खूप काही आहे. लोकांना या चित्रपटातून शिकण्यासारखे बरेच काही असेल, असेही चोप्राने म्हटले. पुढे तो म्हणाला की, या चित्रपटात संजयचे त्याच्या वडिलांसोबत असलेले नातेही दाखविण्यात येणार आहे. अभिनेता परेश रावल हे संजूबाबाचे वडिल म्हणजेच सुनिल दत्त यांची भूमिका साकारणार असून, रणबीर कपूर हा संजूबाबाची भूमिका साकारेल. संजय दत्तच्या बायोपिकचे दिग्दर्शनक राजकुमार हिरानी करत आहे.

विधू विनोद चोप्रा आणि संजूबाबाने यापूर्वी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘एकलव्य द रॉयल गार्ड’ आणि ‘मिशन कश्मिर’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. विधू म्हणाला की, संजयने येरवाडा तुरुंगातून सुटल्यानंतर मला आणि हिरानीला त्याच्या तेथील प्रवासाबद्दल सांगितले. तेव्हा यावर एक चांगला चित्रपट बनू शकतो असे आमच्या लक्षात आले. तुम्ही डिसेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहात का, असा सवाल करण्यात आला असता विधू म्हणाला की, मी प्रदर्शनाच्या तारखेवरून चित्रपट बनवत नाही. मी एका वर्षात चार चित्रपट बनवण्यापेक्षा चार वर्षात एक चित्रपट बनविणं योग्य समजतो. लवकरच विधू विनोद चोप्रा त्याच्या ‘काश्मिरी पंडीत’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाला सुरुवात करणार आहे.