संजय दत्त आता ‘भूमी’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करायला सज्ज झाला आहे. आग्रा येथे या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. बाप आणि मुलगी यांच्या नातेसंबंधांवर हा सिनेमा भाष्य करणार आहे. या सिनेमात अदिती राव हैदरी ही संजयच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. बुधवारी या सिनेमाचा सेट आग्यामध्ये लावण्यात आला होता. यावेळी संजय दत्तला पाहण्यासाठी तिथे गर्दीही जमा झाली. संजयही यावेळी प्रत्येकाला हात दाखवत फोटो काढू देत होता. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संजयने सांगितले की, ‘मी अशा संहितेच्या शोधात आहे, जी माझी प्रतिमा बदलू शकेल. मी काही तरी वेगळं करु इच्छितो. भूमी या सिनेमाची कथा भावनात्मक आणि संवेदनशील आहे. यात बाप आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य केले आहे.’

सिनेमाबद्दल सांगताना दिग्दर्शक ओमंग कुमार म्हणाला की, ‘हा सिनेमा प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल. ‘भूमी’ हा सिनेमा भावनात्मक तर आहेच शिवाय यात सूडाची भावनाही आहे.’ या वर्षी ४ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होईल.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर संजय दत्त सिनेमा निवडताना काळजी घेताना दिसत आहे. यामध्ये तो विनोद चोप्रा आणि सिद्धार्थ आनंद यांच्या सिनेमात देखील काम करताना दिसणार आहे. तसेच संजय दत्त मराठी आणि हिंदी सिनेमाच्या निर्मितीमध्येही सहभागी होताना दिसत आहे.

‘भूमी’ सिनेमाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी यापूर्वी प्रियांका चोप्रासोबत ‘मेरीकोम’ आणि ऐश्वर्या रायसोबत ‘सरबजीत’ हे सिनेमे केले होते. या दोन्ही सिनेमांना चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आगामी सिनेमातून संजूबाबालाही अपेक्षा असतील. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगावासाची शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तचा या सिनेमाने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल. ओमंग कुमार दिग्दर्शित करत असणाऱ्या सिनेमाची टी-सीरीजचे भुषण कुमार आणि संदीप सिंग निर्मिती करणार आहेत.

सध्या संजय फक्त या सिनेमामुळेच नाही तर त्याच्यावर येणाऱ्या आत्मचित्रपटामुळेही तो सध्या चर्चेत आहे. या आत्मचरित्रात संजयची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.