‘दे धक्का’चा हिंदी रिमेक; मकरंद अनासपुरेची भूमिका संजय करणार

दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेता संजय दत्त ही जोडी १९९९ साली आलेल्या ‘वास्तव’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली होती. मुंबईतील गुन्हेगारी जगताची झलक दाखवणाऱ्या या चित्रपटाला अमाप लोकप्रियता मिळाल्यानंतर या जोडगोळीने हिंदीत ओळीने काही चित्रपट दिले. त्यातला ‘कु रुक्षेत्र’ वगळता अन्य चित्रपट फारसे चालले नाहीत. २००४ साली आलेल्या ‘रक्त’ या चित्रपटानंतर या दोघांनीही एकत्र काम केले नव्हते. आज एका तपानंतर महेश मांजरेकर यांनी आपल्या आगामी हिंदी चित्रपटासाठी पुन्हा एकदा जुना मित्र संजय दत्तचा हात धरला आहे.

गेली कित्येक वर्षे महेश मांजरेकर आपल्या लोकप्रिय मराठी चित्रपटांना हिंदीत रिमेक करण्यासाठी प्रयत्नशील होते. यात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘नटसम्राट’ करण्याची घोषणा त्यांनी केली होती. तर नंतर सलमान खानला घेऊन ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हा चित्रपट त्यांना हिंदीत करायचा होता. त्याबद्दलच्या घोषणाही झाल्या होत्या. मात्र या दोन्ही चित्रपटांचा गाडा घोषणांपलीकडे गेला नाही. सलमान खानचाही व्यग्र वेळापत्रकामुळे ‘शिक्षणाच्या आयचा घो’चा विषयही कधीच मागे पडला आहे. सलमानऐवजी गेल्या वर्षी शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या संजय दत्तबरोबर महेश मांजरेकरांनी पुन्हा एकदा जोडी जमवली आहे.

एके  काळी ‘वास्तव’नंतर ‘कुरुक्षेत्र’, ‘हथियार’, ‘रक्त’ या चित्रपटांमधून दिग्दर्शक-अभिनेत्याच्या या जोडीने एकत्र काम केले होते. त्याशिवाय, ‘काटे’, ‘प्लॅन’, ‘मुसाफिर’सारख्या चित्रपटांमधून दोघेही कलाकार म्हणून एकत्र आले होते. मात्र ९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त गजाआड झाल्यानंतर सगळ्याच गोष्टी थांबल्या होत्या. त्याहीआधी दिग्दर्शक म्हणून मांजरेकर मराठी चित्रपटांमध्ये रमले होते. आता इतक्या वर्षांनी हिंदीत दिग्दर्शक म्हणून पुन्हा पाऊल टाकण्यासाठी त्यांनी संजयबरोबर जोडी जमवली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तलाही मोठा चित्रपट मिळालेला नाही. नाही म्हणायला ‘टोटल धम्माल’, ‘मुन्नाभाई’चा तिसरा सिक्वल, त्याच्या होम प्रॉडक्शनचा ‘हसमुख पिघल गया’ अशा चित्रपटांची चर्चा आहे. पण त्यापैकी अजून एकाही चित्रपटाबद्दलची घोषणा झालेली नसल्याने मांजरेकरांचा चित्रपट हाच त्याच्या पुनरागमनाचा चित्रपट ठरणार आहे. मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या ‘दे धक्का’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये संजय काम करणार आहे. एका गमतीशीर कुटुंबाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांची मुख्य भूमिका होती ती संजय करणार आहे. ‘मेरी कोम’फे म ओमंग कुमार आणि संदीप सिंग यांची निर्मिती असलेल्या या हिंदी रिमेकमध्ये संजयबरोबर आणखी कोणते कलाकार असणार याबद्दल एकच चर्चा सुरू झाली आहे.