निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेत असतो तो विविध कारणांनी. त्याच्या चित्रपटांपासून ते अगदी त्याच्या प्रत्येक वक्तव्यापर्यंत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. सध्या करण जोहर चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमामुळे. सेलिब्रिटींच्या मुलाखती, करणच्या खुमासदार सूत्रसंचासनाची जोड आणि या कार्यक्रमातील रॅपिड फायर राऊंड हे या चॅट शो मधील महत्त्वाचे घटक आहेत. करणसोबत गप्पा मारण्यासाठी त्याच्या या चॅट शो मध्ये येणाऱ्या सिलिब्रिटींना रॅपिड फायर या धम्माल खेळाअंतर्गत झटपट काही प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे देताना कलाकारांची उडणारी तारांबळ पाहण्याजोगी असते. पण, करणने नुकताच याबाबचा एक खुलासा केल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

करणने त्याच्या ‘अॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रपर पुस्तकामध्ये यासंदर्भातील खुसाला केला आहे. पुस्तकात नमूद केल्यानुसार ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच पर्वाविषयी सांगताना करण म्हणत आहे की, ‘कॉफी विथ करण या माझ्या कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी फक्त एकाच सेलिब्रिटीला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची कल्पना दिली होती. तो सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता संजय दत्त. त्यावेळी संजय दत्त अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत माझ्या कार्यक्रमाला येणार होते. मला माहित होते की सुश्मिता माझ्या प्रश्नांची झटपट उत्तरं देणार आणि तिच्या तुलनेत संजय दत्त काहीसा कमी पडणार. त्याचे कारण असे की संजय दत्त त्यावेळी काहीसा संकुचितही होता. त्या एकमेव कारणासाठीच मी त्याला रॅपिड फायरसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची आधीच कल्पना दिली होती आणि संजय दत्तने त्यावेळी रॅपिड फायरमध्ये बाजी मारत बक्षिसही मिळवले होते’.

sunjay-dutt

करणचे आत्मचरित्रपर पुस्तक नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. या पुस्तकातील काही भागामध्ये करणने आपल्या गे असल्याच्या प्रश्नावरुनही पडदा उचलला आहे. करणच्या म्हणण्यानुसार, ‘सर्वांनाच माझे सेक्शुअल ओरिएन्टेशन ठाऊक आहे. ते मला इतरांना आरडाओरडा करुन सांगण्याची गरज नाही. आणि जर का त्याविषयी मी काही बोलायचे म्हटले तरीही मी ते करु शकत नाही. कारण, आपण ज्या देशात राहतो तेथे मला जेलमध्ये जावे लागेल. म्हणूनच मी करण जोहर ते तीन शब्द बोलणार नाही जे इतरांना ठाऊकच आहेत’, असे करणने पुस्तकामध्ये म्हटले आहे. त्यासोबतच स्वत:बद्दलच्या बऱ्याच गोष्टींचा खुसालाही त्याने या पुस्तकातून केला आहे.