संजय लीला भन्साळी यांनी आतापर्यंत बॉलिवूडला अनेक कलाकार दिलेत. त्यातले काही कलाकार तर आज सुपरस्टार झाले आहेत. रणबीर कपूर आणि सोनम कपूर ही त्यातलीच नावं. सलमान खान- ऐश्वर्या राय बच्चन या जोडीसोबत हिट सिनेमे केल्यानंतर संजयची गट्टी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोबत जमली. या जोडगोळीसोबत ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ हे दोन हिट सिनेमे केल्यानंतर हे त्रिकूट ‘पद्मावती’ सिनेमासाठीही एकत्र आलं आहे.

PHOTO: आणखी एक अभिनेत्री गुपचूप अडकली विवाहबंधनात

पण ‘पद्मावती’नंतर भन्साळी काय करणार, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलाय. अर्थात ते लगेचच त्यांच्या आगामी सिनेमाच्या कामाला लागणार हे निश्चित आहे. लवकरच भन्साळी त्यांची बहिण बेला सेहगलची मुलगी शर्मिन सेहगलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत. पण या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार आहे, हे तुम्हाला माहित आहे का?. टिंग्या, ‘देख इंडियन सर्कस’ सिनेमाचा दिग्दर्शक आणि ‘टपाल’ सिनेमाचा लेखक- निर्माता मंगेश हाडवळे याच्या ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांनी नेहमीच मराठी कलाकारांमध्ये स्वारस्य दाखवले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘लाल इश्क’ या मराठी सिनेमाची निर्मितीही केली होती. मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळणारे महत्त्व चांगलेच अधोरेखित होते.

संजय लीला भन्साळी यांचा हा संगीतमय सिनेमा असणार आहे. सिनेमात तरुण जोडप्याची कहाणी सांगण्यात येणार असून शर्मिन या भूमिकेसाठी योग्य असल्याचे भन्साळी टीमचे म्हणणे आहे. आता भन्साळी यांचा सिनेमा म्हटल्यावर तो बिग बजेट असेल यात काही शंका नाही. त्यांना शर्मिनच्या पदार्पणामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव ठेवायची नाही. शर्मिन ही संजय लीला भन्साळी यांची बहिण बेला सेहगल हिची मुलगी आहे. बेलाने संजयच्या अनेक सिनेमांचे संकलन केले आहे. बेलाचे पती आणि शर्मिन हिचे बाबा सुप्रसिद्ध दिग्दर्शक मोहन सेहगल यांचे पुत्र आहेत. या सिनेमाबद्दल अधिक माहिती मिळाली नसून लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल असे म्हटले जात आहे.