बॉलीवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर खान हिला पार्टी करणे खूप आवडते. तिला तिच्या मित्रमंडळींसह मजा मस्ती करणे आवडते. नुकतीच तिने तिच्या घरी एका डिनर पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या डिनर पार्टीत सैफची पहिल्या पत्नीपासूनची मुलगी सारा अली खान ही देखील उपस्थित होती. पण, यावेळी ती पार्टीला एकटी आली नव्हती. तिच्यासोबत बॉलीवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर याचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा देखील होता.

साराने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यात ती सुंदर दिसतच होती. तर दुसरीकडे, हर्षवर्धनही जिन्स आणि टी शर्ट अशा साध्याच लूकमध्ये कूल अंदाजात दिसत होता. या दोघांसोबत तेथे सैफची बहिण सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमू हे देखील होते. साराच्या प्रोफेशनल लाइफविषयी बोलायचं झालं तर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, सारा तिच्या पदार्पणातील चित्रपटासाठी बाइक चालवायला शिकणार आहे. तसेच, या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत दिसणार असल्याचे म्हटले जातेय.

एका मुलाखती दरम्यान सैफने सांगितले की, मी सध्या फार खूश आहे. माझं आणि माझ्या मुलीचं नातं खूप चांगलं आहे. मी तिच्यासाठी एक मार्गदर्शक, योग्य निर्णय घेण्यात मदत करणारा असा मित्र आहे. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा करतो. आम्ही सुट्ट्यांसाठी इटलीलाही गेलो होतो. तिकडे आम्ही कला, आयुष्य आणि सिनेमे अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली. मी तिला काही गोष्टींबद्दल माझे मतही सांगितले. मी तिला सांगितले की, कोणी काहीही लिहू दे, त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. हे मी सगळे शिकलो आहे आणि जेव्हा मी मुंबईत आलो होतो, तेव्हा तुझ्या आईने (अमृता सिंग) मला खूप काही शिकवले होते. सारा जेव्हा दोन वर्षांची होती तेव्हा पासून तिला एक अभिनेत्री बनायचे होते. पण मी तिला सांगितले की आधी आपले शिक्षण पूर्ण करायचे. साराने अमेरिकेत थिएटरही केले आहे. एक ग्लॅमरस क्षेत्र म्हणून ती याकडे पाहत नाही. ती अभिनय करणं एन्जॉय करते. सारा माझी ताकद आणि मला मिळालेला आशिर्वाद आहे. तिच्या आणि माझ्या वयात फार कमी अंतर आहे. त्यामुळे आम्ही अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने चर्चा करु शकतो. मी साराच्या बाबतीत कधीच सक्त भूमिका घेत नाही. आम्ही खूप बोलतो आणि प्रत्येक संभाषण एन्जॉयही करतो.

दरम्यान, सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिच्याशी निगडीत एक मोठी गोष्ट समोर येत आहे. असेही बोलले जात आहे की, सारा लवकरच हृतिक रोशनसोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर करणार आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन अग्निपथचा दिग्दर्शक करण मल्होत्रा करणार आहे. असे असले तरी या सिनेमाशी निगडीत कोणत्याही व्यक्तिने अधिकृत माहिती दिली नाही. पण अहवालानुसार, सारा ज्या सिनेमातून पदार्पण करणार तो सिनेमा एक विनोदी चित्रपट असेल. करणला या सिनेमाची कथाही पसंत पडली आहे. काही दिवसांपूर्वीच सैफ आणि अमृताच्या दोन्ही मुलांनी सैफिनाच्या छोटे नवाब तैमुरच्या येण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळी सारा आणि इब्राहिमने अनेकांचे लक्ष वेधले होते.