सरबजित या आपल्या आगामी चित्रपटामधून शेजारील देश पाकिस्तानचे वाईट चित्रण करण्यात आलेले नाही. हा चित्रपट फक्त दोन देशांच्या संबंधांतील चढउताराचा सर्वसामान्य कैद्यावर कसा परिणाम होतो. यावरच भाष्य करतो, असे या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुडाने म्हटले आहे. पाकिस्तानमधील कारागृहात सहकारी कैद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सरबजित सिंग याच्यावर हा चित्रपट आधारलेला आहे.
रणदीप म्हणाला, हा चित्रपट पाकिस्तानमधील कारागृहावर आधारलेला आहे. पण त्यामधून पाकिस्तानचे वाईट चित्रण निश्चितपणे करण्यात आलेले नाही. केवळ दोन्ही देशांमधील संबंधांच्या चढउतारांमध्ये एका सामान्य कैद्याची कशी ओढाताण होते, हेच सरबजितमधून दाखवण्यात आले आहे. जर तुम्ही एखाद्या कैद्यासोबत त्याने केलेला गुन्हा किती गंभीर आहे यापेक्षा तो कोणत्या देशाचा नागरिक आहे, हे बघून वागू लागला तर ते नक्कीच चूक आहे. मग तो देश कोणताही असू दे, असे त्याने म्हटले आहे.
दोन मे २०१३ रोजी सरबजित सिंगचा पाकिस्तानातील लाहोरमधील कारागृहात मृत्यू झाला होता. त्याच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रणदीप हुडाही सहभागी झाला होता.