‘स्टार प्लस वाहिनी’वरील एका गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्रीचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील प्रतिभा तिवारी या अभिनेत्रीने तिची छेडछाड झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रतिभा ‘नाइया’ची व्यक्तिरेखा साकारते. मुंबईत घडलेल्या या घटनेमध्ये एका मद्यधुंद इसमाने या अभिनेत्रीशी गैरवर्तन केल्याची माहिती मिळाली असून कांदिवली हायवे येथून प्रतिभा तिच्या हेअरड्रेसरसोबत जात असताना ही घटना घडल्याचे वृत्त हाती आले आहे.
एका सहकाऱ्याची प्रतिक्षा करत असताना तिथे मद्यधुंद अवस्थेतील एका इसमाने अचानक प्रतिभाशी बोलायला सुरुवात केली. दरम्यान, या व्यक्तिने प्रतिभासोबत असभ्य वर्तन केल्यामुळे तिने थेट त्या इसमाला पोलीस स्थानकाचा रस्ता दाखवत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. सदर प्रसंगाबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये या अभिनेत्रीने ‘अशा’ प्रसंगी महिलांनी कोणत्याही परिस्थितीत पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे, असे म्हणत शहराच्या इतक्या गजबजलेल्या ठिकाणी विनयभंगासारखी घटना घडणं ही खरंच संतापजनक बाब आहे, असे मतही अभिनेत्री प्रतिभा तिवारी हिने व्यक्त केले. टेलिव्हिजन विश्वात ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रतिभा तिवारी नावारुपास आली असून ‘बद्तमीज दिल’ मालिकेतही प्रतिभा झळकली होती. विविध मालिका आणि जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेली प्रतिभा तिवारी सध्या ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमध्ये व्यस्त आहे. ‘स्टार प्लस वाहिनी’वरील बराच काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक असणाऱ्या या मालिकेत प्रतिभा खलनायकी झाक असलेली एक व्यक्तिरेखा साकारत आहे.