बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘बाहुबलीः द कन्क्लूजन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कन्नड संघटनांचा तीव्र विरोध आहे. तसेच, या चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी बंगळुरु बंद ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. जोवर सत्यराज कन्नड विरोधी टिपणी केल्याबद्दल माफी मागणार नाही तोवर हा विरोध कायम राहणार असल्याचे या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ‘बाहुबलीः द कन्क्लूजन’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी स्वतः ट्विटरवरून या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे. राजामौली यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर दीड मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून सत्यराज यांचे काहीच नुकसान होणार नाही. उलट चित्रपटासाठी काम केलेले तंत्रज्ञ, क्रू, निर्माता आणि कर्नाटकातील वितरकांनाच याचा फटका बसेल, असे म्हणत राजामौली यांनी पहिल्या ‘बाहुबली’वेळी पाठिंबा देणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा तसाच पाठिंबा देण्याची विनंती व्हिडिओद्वारे केलीये.

राजामौली म्हणाले की, ‘मला कन्नड भाषा अस्खलितपणे बोलता येत नाही. त्यामुळे जर मी काही चुकीचं बोललो तर मला माफ करा. सत्यराज वादावर ‘बाहुबली’ची टीम आणि मला काही स्पष्टीकरण द्यायचे आहे. काही वर्षांपूर्वी सत्यराजने केलेल्या वक्तव्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पण, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. ते त्याचे वैयक्तिक मत होते. गेल्या महिन्यात सोशल मीडियावर यासंबंधीत व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला याबद्दल कळले. तोपर्यंत आम्ही या प्रकरणाबद्दल अनभिज्ञ होतो. नऊ वर्षांपूर्वी त्याने हे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट कर्नाटकमध्ये प्रदर्शित झाले. यात ‘बाहुबली: द बिगनिंग’ चित्रपटाचादेखील समावेश होता. आता तसाच पाठिंबा ‘बाहुबली २’ चित्रपटालासुद्धा द्या अशी आम्ही विनंती करतो. सत्यराज हा चित्रपटाचा दिग्दर्शकही नाही आणि निर्मातादेखील नाही. चित्रपटामधील इतर सहकलाकारांपैकी तो एक आहे. चित्रपटाला विरोध केल्याने त्याला काहीच नुकसान होणार नाही. एका व्यक्तीवर राग व्यक्त करण्यासाठी चित्रपटाशी निगडीत इतर लोकांना त्रास देणं चुकीचं असल्याचं आम्हाला वाटतं. आम्ही ही सर्व परिस्थिती सत्यराजला फोनवरून सांगितली आहे. त्याव्यतिरीक्त आम्ही काहीच करु शकत नाही. या सर्व प्रकरणामध्ये आम्हाला गोवू नका अशी विनंती राजामौली यांनी प्रेक्षकांना केली.

‘कर्नाटक रक्षा वेदिका’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बंगळुरु येथील ‘कर्नाटक फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स’च्या कार्यालयाबाहेर ‘बाहुबली २’ च्या प्रदर्शनाला विरोध केला. काही वर्षांपूर्वी कावेरी पाणी प्रकरणात अभिनेता सत्यराजने कन्नड भाषिक लोकांविरोधात प्रखर मत मांडले होते. त्यामुळेच आता कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. ‘सत्यराजने केवळ सहा कोटी कन्नड नागरिकांच्या भावना दुखावल्या नाहीत. तर त्याच्या वक्तव्यामुळे दोन्ही राज्यातील शांततादेखील बिघडली आहे. त्याला देशद्रोही म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तो एक तमिळ अभिनेता आहे. जेव्हा तो कर्नाटकबद्दल काही चुकीचं वक्तव्य करतो तेव्हा कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्व लोकांनी एकत्र येऊन त्याच्या वक्तव्याचा निषेध करायला हवा, असे कर्नाटक रक्षा वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्याने म्हटले आहे.