‘वॉरियर सावित्री’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर काळे ढग घोंगावत आहेत. २५ ऑगस्ट रोजी भारत आणि अमेरिकेत प्रदर्शित होणऱ्या या चित्रपटात पौराणिक कथेतील सावित्रीला २१ व्या शतकातील मॉडर्न अवतारात दर्शविल्यामुळे ‘वॉरियर सावित्री’ला विरोध होत असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन दिग्दर्शक परम गिल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी त्यांची प्रतिमा जाळून निदर्शने केली होती. रायपुरसह देशातील अनेक भागांत परम गिल यांचे पुतळे जाळण्यात आल्याचे वृत्त आहे. हा चित्रपट हिंदू देवीची खिल्ली उडवत असल्याचे गेल्या महिन्यात लाल बहादुर शास्त्री सोशल फोरमचे अध्यक्ष सुशिल कुमार मल्होत्रा यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. चित्रपट अश्लिल असून, महाभारतातील कथेनुसार सावित्री एक अशी स्त्री होती जिने यमाशी टक्कर घेऊन आपला पती सत्यवानाचे प्राण वाचविले होते. हिंदू पुराणकथेनुसार सावित्री अत्यंत चांगल्या पत्नीचे प्रतिक असल्याचेदेखील मल्होत्रा म्हणाले.

परम गिल यांनी सावित्रीला २१ व्या शतकातील कणखर आणि प्रबळ स्त्रीच्या स्वरुपात चित्रीत केले आहे. यूट्युबवरील चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सावित्रीला शत्रुंशी लढतांना मार्शल आर्टचा वापर करताना दर्शविण्यात आल्याचा चित्रपटाशी संबंधितांनी दावा केला आहे. ‘वॉरियर सावित्री’ निहारिका रायजादा सावित्रीच्या मुख्य व्यक्तिरेखेत दिसेल. चित्रपटात तिची काही बोल्ड दृश्ये असून, चित्रपटात ती तोकड्या कपड्यांमध्ये वावरताना दृष्टीस पडेल. २०१२ मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणावरून प्रेरणा घेऊन आपल्याला या चित्रपटाची कल्पना सुचल्याचे सांगत, आजच्या युगात स्वरक्षणासाठी स्त्रीयांना मार्शल आर्ट शिकणे आणि स्वताला कणखर बनविणे गरजेचे असल्याचे, आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान गिल म्हणाले होते. चित्रपटाचे प्रदर्शित करू नये यासाठी भारतातील अनेक संस्थांनी पत्र येत असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी भारतात जण्यासाठी आपण घाबरत असल्याचेदेखील ते म्हणाले. देशात असहिष्णुतेचा एक सर्वसाधारण पॅटर्न असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

लॉस एंजेलिसवरून मुंबईला येण्यासाठी मी विनानतळावर पोहचले होते. तेव्हा मला निर्मात्यांचा फोन आला आणि चित्रपटाभोवती वादाचे वादळ निर्माण झाल्या कारणाने सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत न येण्याचा सल्ला त्यांनी मला दिला. भारतात सहिष्णुता असल्याचे माझे मानणे आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी भारतात येऊ शकत नसल्याने आपण व्यथित झाल्याची प्रतिक्रिया चित्रपटातील अन्य अभिनेत्री लूसी पिंडर हिने दिली.

मी जीवनभर हॉलिवूडमध्ये काम केले, परंतु जन्माने मी भारतीय असल्याने हा देश माझ्या हृदयात वसतो. माझा पहिलाच बॉलिवूडपट ‘वॉरियर सावित्री’च्या प्रसिध्दीसाठी भारतात यायला मी उत्सुक होतो. चित्रपटावर बंदी आणण्यासाठी देशभर निदर्शने करण्यात आली आणि माझा पुरळा जाळण्यात आल्याच्या घटना घडल्याने निर्मात्यांनी मला भारतात न येण्याचा सल्ला दिला. माझा विरोध करणारे आणि निदर्शने करणाऱ्यांसाठी मुंबईत चित्रपटाच्या खास खेळाचे आयोजन करण्यात येईल, त्यांनी हा चित्रपट पाहावा अशी मी त्यांना विनंती करतो. चित्रपटात त्यांना काहीही आक्षेपार्ह दिसणार नाही किंबहूना चित्रपट पाहून त्यांना प्रेरणाच मिळेल असे मत दिग्दर्शक परम गिल यांनी व्यक्त केले.

रायपुरमध्ये गिल यांचा पुतळा जाळतानाचा व्हिडिओ